कोपरगावात ५ नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन साजरा
Marathi Rangbhoomi Day
कलासाई नाट्य संस्था व संकल्पना फाउंडेशन
वृत्तवेध ऑनलाईन | Fri6 Nov 2020, By:RajendraSalkar, 14:14 pm
कोपरगाव: कोपरगाव येथे कलासाई नाट्य संस्था व संकल्पना फाउंडेशन यांच्या वतीने विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पुजन करून व आदरांजली वाहून ५ नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन साजरा घेण्यात आला.
कलासाई नाट्य संस्थेच्या हर्षदा दिवे या स्त्री रंगकर्मीच्या हस्ते नटराज व रंगमंचची पूजा करून नारळ फोडण्यात आला. यावेळी रंगकर्मी रेखा दिवे, प्रियांका शिंदे,पायल भडकवाडे, गणेश गायकर, वाल्मिक सातपुते, हर्षदा दिवे, सुयोग मावळकर, सागर कालेकर, गोपीनाथ घोरपडे, शैलेश शिंदे आदी कलाकार हजर होते.
कोपरगावात दर्जेदार कलावंत निर्माण होतील. असे मत डॉ योगेश लाडे यांनी
संकल्पना फाउंडेशन यांच्या कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी नाट्यरसिक सुनील शिलेदार, डॉ.मयूर तिरमखे,प्रा.गजानन पंडीत, चेतन गवळी,प्रवीण शेलार, रोहीत शिंदे कैलास नाईक,योगेश सोनवणे, श्रीकांत साळुंके,सागर पवार,वैभव बिडवे,प्रसाद सोनवणे प्रा.कल्पना निंबाळकर,प्रा.सुनिता सूर्यवंशी,प्रा.मधुमिता निळेकर,साईश कुलकर्णी,कस्तुरी सोनवणे आदी नाट्य कलाकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव गणेश सपकाळ यांनी केले.
५ नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन. सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या आशीर्वादाने ‘सीता स्वयंवर’ हे पहिलंवहिलं मराठी नाटक रंगभूमीवर आलं. हा प्रयोग सांगलीच्या राजदरबारात झाला. तो दिवस होता ५ नोव्हेंबर १८४३. ‘सीता स्वयंवर’चे सर्वेसर्वा अर्थात विष्णुदास भावे. नाटय़ लेखन, गीतं, दिग्दर्शन…सारं भाव्यांचं. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजे ५ नोव्हेंबर १९४३ रोजी ‘सीता स्वयंवर’चा शतक महोत्सवी सोहळा सांगलीत आयोजित करण्यात आला. तेंव्हापासून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या मराठी रंगभूमीला तब्बल १७७ वर्षांची परंपरा आहे. पूर्वी पौराणिक, ऐतिहासिक नाटकं व्हायची. नंतर सामाजिक नाटकांनी जोर धरला. कालांतराने विनोदी नाटकं, फार्सिकल नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच समांतर रंगभूमी सशक्त झाली. मराठी रंगभूमीने फक्त सुवर्णकाळ पाहिला असं नाही. वेळोवेळी संकटं आली, रंगभूमीला हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात दुरावा निर्माण झाला. कधी जातीय दंगली झाल्या तर कधी बॉम्बस्फोट. कधी पावसाने झोडपून काढलं. टीव्ही, सीरियल, चित्रपट, वेब सीरिज यांच्या जोडीला क्रिकेटचे सामने आहेतच, पण…कोविडसारख्या महामारीने सगळं जग उद्ध्वस्त झालं, उद्योगधंदे बुडाले. शाळा, कालेजांमध्ये टाळेबंदी झाली. नाटक, चित्रपट धंद्याला मोठी झळ बसली. मराठी रंगभूमी गेले सात-आठ महिने बंद आहे. हा भीषण कालावधी आहे. त्या मुहूर्तावर ५० टक्के क्षमतेसह राज्यातील नाटय़गृहे हे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हे चांगलेच झाले.
आपली प्रतिक्रिया द्या