शिर्डी – नगररस्त्यासाठी ४३० कोटी, पण शिर्डी- कोपरगाव रस्त्याला ढबूही नाही – साहनी

शिर्डी – नगररस्त्यासाठी ४३० कोटी, पण शिर्डी- कोपरगाव रस्त्याला ढबूही नाही – साहनी

उदासीन आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का?

वृत्तवेध ऑनलाईन।Tue 24Nov2020,By:RajendraSalkar,17:00

कोपरगाव : जागरूक   आमदारांमुळे राष्ट्रीय महामार्ग १६० या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले, पण मग नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या शिर्डी कोपरगाव रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही. याचा अर्थ येथील उदासीन आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग उर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नगर-मनमाड ७५२ जी महामार्गावर हजारो खड्डे अवतरतात आणि हे त्यांचे अवतारकार्य दिवाळीपर्यंत सुरू राहते. खाचखळग्याचा मार्गातून वाट काढत कोपरगाववासीयांचा प्रवास सुरूच राहतो. कोपरगाव शिर्डी या पट्टय़ात महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे १४ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दिड ते दोन तासांचा अवधी लागतो आहे. खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरवर्षी महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्गावरील खड्डय़ाची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही. मध्यंतरी नगर ते शिर्डी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६० कामासाठी ४३० कोटी मंजूर झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी शिर्डी ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार खासदार यांच्याकडून निधी मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या कोणत्याही हालचाली व प्रयत्न दिसत नाही. असा आरोपही सहानी यांनी केला असून याबाबत येथील जनतेमध्ये मोठा रोष आहे.
कुंभकर्णी निद्रेत असलेल्या आजी माजी आमदार खासदार नगराध्यक्ष विविध पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या बाजारपेठ व उद्योगावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भीती सहानी यांनी व्यक्त केली आहे.

गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणाऱ्या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत शिर्डी साठी येणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावरील जड वाहने रिक्षा प्रवासी वाहतूक ऊस वाहतूक यासह लहान वाहनांची संख्याही वाढते. रस्ता रुंदीकरणाची काम जिथे झाली आहेत तिथेही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन आहेत.

थातूरमातूर कामे केली जातात. थोडय़ाशा पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परीस्थिती कायम आहे. कोपरगाववासीयांच्या नशिबी मात्र खडतर प्रवासाचा मार्ग कायम आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव शिर्डी या रस्त्यासाठी शासन दरबारी आपली कारणे मांडून जनतेलाच लढा उभारावा लागेल असे आवाहन सहानी यांनी शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page