कोपरगावात ग्रामपंचायत निवडणुक राजकारण तापू लागले ; दुसऱ्या दिवशी बारा अर्ज दाखल
Gram Panchayat Election
वेळापूर जेऊर पाटोदातून शुभारंभ
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24 Dec 2020, 17:00:00
कोपरगाव : बुधवार (२३) तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निरंक राहिले आहे. तर गुरुवारी (२४) रोजी दुसऱ्या दिवशी एकूण बारा अर्ज प्राप्त झाले असून यात आठ पुरुष व चार महिला यांचा समावेश आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकारण हळुहळु तापू लागले आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत सदस्य निवडीनंतर होणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर डोळा ठेवून असणारांची गोची झाली आहे. मात्र आता ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी व्युहरचना केली जात आहे.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ काही महिन्यांपुर्वीच संपुष्टात आला होता. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगीत करून ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकावर सोपविण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागला असल्याने स्थगित करण्यात आलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून आज २३ डिसेंबर २०२० रोजी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरवात झाली असून पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने पहिला दिवस निरंक राहिला आहे तर दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर २०२० रोजी वेळापूर तीन जेऊर पाटोदा नऊ असे १२ अर्ज प्राप्त झाले असून यात वेळापूर प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण पुरुष २ अर्ज प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण स्त्री १ अर्ज, असे एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर जेऊर पाटोदा प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण स्त्री एक अर्ज, एस.टी पुरुष एक अर्ज, एस. सी पुरुष एक अर्ज, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण पुरुष एक अर्ज, प्रभाग क्रमांक ३, सर्वसाधारण पुरुष एक अर्ज, प्रभाग क्रमांक ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष २ अर्ज नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एक अर्ज सर्वसाधारण स्त्री एक अर्ज असे ९ उमेदवारी अर्ज जेऊर पाटोदा येथे दाखल झाले आहेत. यात आठ पुरुष व चार महिलांचा समावेश असल्याची माहिती नि.नि.अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.
कोपरगाव तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या गावातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. काही गावातील ग्रामस्थ सामज्यसपणे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतू ज्या गावांमध्ये जोरदार पक्षीय राजकारण आहे त्या गावांमध्ये मात्र जोरदार गोर्चेबांधणी सुरु झाली आहे.