दत्तजयंती निमित्त देवगडकडे जाणारे रस्ते दोन दिवस बंद रहाणार,देवगड संस्थानचा निर्णय-गुरुवर्य भास्करगिरी महाराज
Devgad Datta Jayanti
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25 Dec 2020, 18:00:00
नेवासा प्रतिनिधी: शाम मापारी
नेवासा: तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी दि.२९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद रहाणार असा निर्णय श्री दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला असल्याची माहिती श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
याबाबत श्री दत्त मंदिर संस्थान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की या वर्षी कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्वच क्षेत्रामध्ये कमालीची स्वच्छता व सुरक्षित अंतर पाळण्यात येत असून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन प्रशासनाकडून अनेक बंधने आलेली आहेत. त्या दृष्टीने कार्यकारी मंडळ तसेच भक्तगणांशी चर्चा करुन या वर्षी संपन्न होणारा भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतलेला आहे.
शेजारील कर्नाटक व इतर ठिकाणी जाहिर झालेले नविन लॉकडाऊन व नुकत्याच पार पडलेल्या श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र जेजूरी येथील अनुभव लक्षात घेता संस्थान प्रशासनाने दत्त जन्म सोहळा प्रसंग अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे.
त्यादृष्टीने मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० रोजी सकाळपासून ते बुधवार दि:३० डिसेंबर २०२० सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगड कडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून श्री क्षेत्र देवगड येथील नविन स्वागतद्वार ही पूर्णपणे बंद रहाणार असून याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले आहे.
दत्त जन्मसोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये,यासाठी दत्त जन्म सोहळ्याचे विविधदूरचित्रवाहिन्या तसेच फेसबबुक द्वारा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्ष श्री क्षेत्र देवगड येथे येण्याचे टाळावे व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. याबद्दल
भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल संस्थान प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिलगिरी ही व्यक्त केली आहे.