भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुपूजन, गुरुमहती आणि गुरुमहत्त्व जाणून घ्या,
ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की, ‘ग’ कार म्हणजे सिद्ध होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो.
आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाल्याची मान्यता असल्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन केले जाते.
गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरुंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेचे विशेष म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागणारे सन २०२० हे सलग तिसरे वर्ष आहे.
शनिवार, ४ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होणार असून, रविवार, ५ जुलै २०२० रोजी सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे गुरुपौर्णिमा, ५ जुलै २०२० रोजी साजरी केली जाणार आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.
‘मातृदेवो भव:, पितृदेवो भव:’, असेही म्हटले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक, वडील मंडळी, मित्रमंडळी, तज्ज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु, मार्गदर्शक म्हणून लाभतात. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते.
शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.
स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.