शहरातील रस्त्यांच्या काळजीपोटी चक्क नगराध्यक्षांनी बोलवली शहर सभा
The mayor called a city meeting to take care of the roads in the city
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23Jan 2021, 16:00:00
कोपरगाव : सरकारने वाळूचे लिलाव केल्याने मोठ मोठाले डंपर आता शहरातील रस्त्यावरून धावणार असल्याने कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था होणार या काळजीपोटी चक्क नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका पत्रकाद्वारे बुधवारी (२७) रोजी सकाळी ११ वाजता शहर सभा बोलावली आहे.
आपली काळजी व्यक्त करताना पत्रकात वहाडणे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातून वहाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचा लिलाव झाल्याचे समजते.अधिकृत कोण ठेकेदार आहे हे माहित नाही. अनधिकृत बरीच नांवे व पक्ष चर्चेत आहेत.वाळू वाहतूक सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातून मोठमोठे अवजड डंपर,ट्रक,ट्रॅक्टर वाळू वाहतूक करणार यात शंकाच नाही.या वाहतुकीमुळे शहरातील-परिसरातील रस्त्यांची आहे त्यापेक्षा जास्त दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.अपघातांची संख्याही वाढू शकते. सध्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे. कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये यासाठी मी स्वतः उभे राहून इंदिरा पथ येथे वाळूचे अवजड डंपर अडविले होते. ते म्हणतात पण वाळूवाल्यांची दहशत असल्याने कुणीच साथ देत नाही, बोलत नाही,विरोध करत नाही. राजकारणी मंडळीच आश्रयदाते असल्याने त्यावेळी कुणीच बोलले नाही. शहरातील रस्त्यांची दुरावस्था होऊ नये, खड्डे पडून अपघात होऊ नयेत, प्रदूषण होऊ नये म्हणून “कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये ” याविषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार (२७) जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मिटिंग आयोजित केली आहे. कोपरगाव शहरातील जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे ही विनंती. ज्यांना कुणाशीही वाईटपणा घ्यायचाच नाही त्यांनी शक्यतो मिटींगला यायचे टाळावे.ही मिटिंग भाषणबाजी करण्यासाठी नसून फक्त सूचना करण्यासाठी आहे. असे ही पत्रकात शेवटी म्हटले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी भयानक झाली आहे की यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकते असा प्रश्न पडल्याने वहाडणे यांनी अशा अनेक बोलावलेल्या सभेची मात्र शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.