कोकमठाणच्या लक्ष्मीमाता मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर -आ. आशुतोष काळे

कोकमठाणच्या लक्ष्मीमाता मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर -आ. आशुतोष काळे

Kokmathan’s Lakshmi Mata temple gets ‘C’ class status. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25Jan 2021, 17:30

कोपरगाव : अहमदनगर येथील माऊली सभागृहात सोमवारी (२५) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी कोकमठाण गावातील श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या श्री. लक्ष्मीमाता मंदिरास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर केल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी द्या, व रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.
यावेळी आ. काळे यांनी सलग दोन वर्ष मोठ्याप्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या रस्त्यांसाठी भरीव निधी द्या. तसेच रांजणगाव देशमुखसह, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव अशा सात गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. या ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिल थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली असून वारंवार उद्भवणाऱ्या वीज बिलाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची मागणी केली. या मागण्यांपैकी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास या बैठकीत तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करून उर्वरित मागण्यांची देखील लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मागील वर्षी श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे व यावर्षी श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे. श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आल्यामुळे या मंदिराकडे जाणारे रस्ते तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

या बैठकीसाठी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्री घुले, खा. सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ.विमल आगवण, सौ. सोनाली साबळे उपस्थित होत्या.

 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page