कोपरगांव शिर्डी महामार्गाची तातडीने दुरूस्ती करावी – सुमित कोल्हे
Kopargaon-Shirdi highway should be repaired immediately – Sumit Kolhe
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे मागणीDemand to Public Works Minister Ashok Chavan
कोपरगांवः ‘कोपरगांव – शिर्डी रस्त्यावर अनेक मोठे खड्डे असुन त्यात अपघात घडुन अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तातडीने आदेश निर्गमित करावेत’, अशी मागणी संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा नेते श्री सुमित कोल्हे यांनी राज्याचे बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबधितांकडून तातडीने दखल न घेतल्या गेल्यास अमर्याद कालासाठी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या परीस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की मनमाड- अहमदनगर या महामार्गातील कोपरगांव-शिर्डी या रस्त्याची कोविड १९ च्या लाॅकडाऊनच्या आधीपासुन अत्यंत दयनिय अवस्था झाली असुन या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहेत. यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
कालच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरूण प्राद्यापक कै. ऋषिकेश विजय भागवत हे कर्तव्यावर दुचाकीने येत असता त्यांचा सावळीविहीर जवळ असलेल्या खड्यात अपघात झाला, ते खाली कोसळले आणि मागुन येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या परीस्थितीमुळे त्यांची जागीच प्राणज्योत मालवली. अशा अनेकांना या जगाचा जबरदस्तीने निरोप घ्यावा लागला. यात कोणाचे पती, भाऊ, एकुलते एक मुलं मृत्यमुखी पडून अनेकांचे वडीलांचे छत्रच हरपले. प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक कुटूंबे उध्वस्त होत आहेत. यास रस्त्याची दुरावस्था प्रामुख्याने कारणीभुत आहे.
सध्या सर्व शाळा , महाविद्यालये, विविध आस्थापना, कारखाने चालु झाल्यामुळे या स्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. राज्यातील हा एक प्रमुख महामार्ग म्हणुन या रस्त्याची ओळख आहे. रस्ता दुरूस्त होणे बाबत आज पर्यंत अनेक निवेदने, विनंत्या संबंधितांना केल्या असुन कोणतीही कार्यवाही होत नाही, यामुळे नागरीकांची सहनशक्ती संपली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आदेश निर्गमित करावेत, संबधितांकडून तातडीने दखल न घेतल्या गेल्यास अमर्याद कालासाठी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या परीस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे श्री कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Post Views:
457