नगराध्यक्ष आमदाराच्या तालावर नाचतात, तर मुख्याधिकारीही पार्टीसाठीच काम करतात- पराग संधान
The mayor dances to the tune of the MLA, while the Chief officer also works for the party – Parag Sandhan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17Feb 2021, 19:30
कोपरगाव : “शहराच्या विकासात प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके असतात. या दोघांनीही समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. हा समन्वय साधला तरच शहराचा विकास होतो. मात्र कोपरगाव पालिकेत नगराध्यक्ष आमदाराच्या तालावर नाचतात, तर मुख्याधिकारीही खुर्चीसाठी नाही नव्हे तर त्यांच्याच पार्टीसाठी काम करतात असा घणाघाती आरोप अमृत संजीवनी चे चेअरमन भाजपाचे पराग संधान यांनी शिवसेना-भाजपा नगरसेवकांच्या पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारी १६ रोजी नगरपालिका सर्वसाधारण सभेत शिवसेना भाजप नगरसेवकांनी विषय क्रमांक १, ११ १६, व २० नामंजूर केले यावरून राष्ट्रवादी सेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी १७ रोजी शिवसेना भाजप नगरसेवकांच्या पत्रकार परिषदेत संधान बोलत होते.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे म्हणाले, आम्ही मागितलेली माहिती आमच्या नगरसेवकांना न देणे त्यांचा अवमान करण्याची संधी शोधणे, केलेल्या लेखी तक्रारीची दखल न घेणे, मनमानी कारभार करणे, असे करून नगराध्यक्षांनी गेल्या साडेचार वर्षात सेना-भाजपच्या नगरसेवकांच्या हक्कावर गदा आणल्याचा आरोप केला. याचा निषेध म्हणून मंगळवार १६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत आम्ही शिवसेना -भाजपा नगरसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला, लेखी म्हणणे मांडले होते, परंतु त्याची दखल घेतली नाही या कारणास्तव मागील सभेचे इतिवृत्त हा विषय क्रमांक एक नामंजूर करण्यात आला होता. आमचा रस्त्याला विरोध नव्हता तर रस्त्यांचे अवाजवी अंदाजपत्रकाला विरोध केला आहे. नव्याने अंदाजपत्रक बनवून बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेऊन या, या कारणास्तव दोनदा स्थायी समितीतुन नामंजूर केलेला असताना सुद्धा पुन्हा सर्वसाधारण सभेला विषय ठेवला केवळ जनतेचा पैसा वाचविण्यासाठी म्हणून तो सुद्धा नाकारला, आठ कोटी निधी १४ वा वित्त आयोग व न.पा. खंडातील आहे तो परत जाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु खोट्या वावड्या उठवल्या जात आहे. केवळ नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान आमदार व नगराध्यक्ष हे शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा आरोपही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला.
कोपरगाव शहराच्या पाण्यासाठी काळे- कोल्हे यांनी एकत्र यावे, मग पाणी कोठून व कसे आणायचे ते त्यांनी ठरवावे, आमचे काही म्हणणे नाही. परंतु आजच्या परिस्थितीत कितीही तळे खोदले तरी प्रश्न सुटणार नाही.
शहराचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर बंद पाईप मधूनच पाणी आणावे लागेल. हा एकमेव उत्तम पर्याय आहे असे संजय सातभाई म्हणाले,
शहर विकासाचा आव आणणा-यांनी झोपडपट्टीतल्या किती रस्त्याला निधी दिला ते सांगावे असे आव्हान शिवाजी खांडेकर यांनी केले. विकास म्हणणाऱ्यांना जनतेशी काहीही घेणेदेणे नाही फक्त मलिदा वाटून खाण्यासाठी त्यांना मोठी कामे हवीत सांगूनही अंदाजपत्रकात बदल केल्यामुळे आम्ही तिसऱ्यांदा हाणून त्यांचा डाव हाणून पाडला असे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी सांगितले.
सर्व पक्ष पाठीमागे असतांना गेल्या ११ वर्षांत एकाही विस्थापितांचे पुनर्वसन झालेले नाही मग घोडे अडले कुठे ? सत्तेवर बसलेल्यांनी काय केले ? विस्तापितापैकी काही गाव सोडून तर काही जग सोडून गेले आज गरज नसलेले लोक ठिकाणी टपऱ्या टाकत आहे असा आरोप कैलास जाधव यांनी केला.
ईडीची चौकशी कशाला,गेल्या चार वर्षात काढलेली बिले, मुरूम, रस्ते झालेली कामे याची चौकशी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लावणार आहोत, जिल्हाधिकां-च्या चौकशीनंतर बेडीच, राज्य सरकार यांचे, आमदार यांचा, मुख्याधिकारी यांचे व नगराध्यक्ष ही यांचेच खरे सत्ताधारी तर हेच आहेत. उसा मिश्किल टोला संधान यांनी यावेळी लगावला. गेल्या चार वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचे नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आलो, हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाही माहित आहे. महाविकास आघाडी आजची आहे. तेंव्हा पाच वर्ष युतीचा धर्म पाळणार त्यानंतर पक्षाचा व पक्षप्रमुखांचा जो निर्णय असेल तो आम्ही मानू शिवसेना काय आहे. हे आम्हाला कोणी शिकवू नये, विशेषता दुसर्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपले पहावे अशा तीव्र शब्दात संतप्त प्रतिक्रिया कैलास जाधव यांनी शेवटी व्यक्त केल्या.
पत्रकार परिषदेत नगरसेवक जनार्दन कदम, दीपा गिरमे, बबलू वाणी, विनोद राक्षे, संजय पवार यांनीही चर्चेत भाग घेतला.