कोपरगावात श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांचा अंत्यसंस्कार

कोपरगावात श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांचा अंत्यसंस्कार

Sri Sri 1008 Mahant Swami Amargiri Maharaj at Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18March 2021, 21 :30

 कोपरगाव : श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांच्या पार्थिवावर काल गुरुवारी (१८) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कोपरगाव बेट येथील स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

मूळचे क-हे ,तालुका संगमनेर येथील श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज हे गेल्या बारा-तेरा वर्षापासून कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात वास्तव्यास होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी (१८) सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. संगमनेर तालुका व सिन्नर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महंत स्वामी अमरगिरी महाराजांचा मोठा भक्तपरिवार आहे या भक्तांना दहा वाजेच्या सुमारास या दुःखद निधनाची बातमी कळाली त्यामुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी शेकडो भक्त कोपरगाव येथे आले होते. कोरोनामुळे निधन झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महंत स्वामी अमरनाथ महाराज यांना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी  कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने कोपरगाव बेट येथील स्मशानभूमीत दुपारी आणले होते. याची माहिती भक्तजनांना कळताच नातेवाईक व शेकडोच्या संख्येने भक्तजन या ठिकाणी जमा झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज असल्याने त्यांना अग्निडाग देऊ नका आम्हाला त्यांची समाधी बांधावयाची आहे असा हट्ट महंतांच्या नातेवाईक व भक्तगणांनी घेतल्याने पोलीस प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला. वातावरण इतके तापले होते की, भक्तजन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तहसीलदार योगेश चंद्रे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी मध्यस्थी करुन उपस्थित नातेवाईक व भक्तांना महंत स्वामी अमरगिरी महाराज यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग द्यावा लागेल, अन्यथा उपस्थितांना ही संसर्ग होऊ शकतो, असे समजावून सांगितले. शेवटी पोलीस प्रशासनाला भक्तांवर कारवाई करण्याची वेळ आली. त्यावेळेस प्रशासनाचा आदेश मान्य करून भक्तगणांनी श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यास परवानगी दिली, त्यानंतर श्री श्री १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने, सहाय्यक फौजदार बबन साठे, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे, नवाळे, कांबळे आदी सर्व पोलिस कर्मचारी हजर होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा   श्री श्री एकशे १००८ महंत स्वामी अमरगिरी महाराज यांचे नातेवाईक व इतर अशांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page