मतदार संघात रिकाम्या इमारतीत विलगीकरण कक्ष उभारा,- स्नेहलता कोल्हे
Set up a separation room in an empty building in the constituency, – Snehalta Kolhe
कोपरगाव शहर व तालुक्यातील गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असल्याने तातडीने ठिकठिकाणी विलगीकरण कक्ष उभारावेत,
कोपरगाव : कोपरगावमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरासह तालुक्यातील विविध शासकीय इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सध्या कोपरगाव मधील एस. एस. जी. एम. कॉलेज, मुकबधिर विद्यालय व ग्रामीण रुग्णालयात कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा ही चिंताजनक ठरत असुन त्यासाठी कठोर पाउले उचलण्याची गरज असून नॉन कोविड रुग्ण आणि विशेषतः प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवतींसाठी हे धोक्याचे आहे. अशा परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष तातडीने स्थापन करण्याची गरज असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कोपरगावात अपु-या सुविधांमुळे रूग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने संशयित रूग्णाची तपासणी केल्यानंतर अहवाल येण्यास ४-५ दिवसाचा कालावधी लागतो, या विलंबाच्या काळात सदरचा संशयित रूग्ण हा समाजव्यवस्थेच्या संपर्कात येतो, तसेच घरी न थांबता फिरत असल्याने अनेकांशी संपर्क येतो, त्यामुळे रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. वास्तविक संशयित रूग्णास तातडीने विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने मतदार संघातील रिकाम्या इमारतींचा ताबा घ्यावा आणि कोविड, नॉन कोविड अशी विभागणी करावी त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात येण्यासाठी मदत होईल असे सौ कोल्हे यांनी निवेदनातून म्हटले आहे .





