पाटबंधारे विभाग बिगर मोसमी पावसाची वाट बघते काय ?- परजणे 

पाटबंधारे विभाग बिगर मोसमी पावसाची वाट बघते काय ?- परजणे

Is Irrigation Department waiting for non-seasonal rains?

कोपरगाव : सद्या उन्हाची तिव्रता प्रचंड वाढली असल्याने रब्बी पिकांना दोन – तीन दिवसात गोदावरी कालव्याद्वारे पाणी मिळाले नाही तर सर्वच पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाली असताना पाटबंधारे विभाग बिगर मोसमी पावसाची वाट बघत आहे की काय ? असा सवाल झेडपी  सदस्य राजेश परजणे यांनी केला.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात ऊसाबरोबरच खोडव्याचे पीक प्रचंड प्रमाणात आहे. चारा व भाजीपाला तसेच उन्हाळी रब्बी पिके सद्या शेतात उभी आहेत. विजेच्या लपंडावामुळे पाणी देता येत नाही. काही ठिकाणची पाणी पातळी खालावल्याने विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेततळे, के. टी. वेअरमध्ये पाणी शिल्लक नाही.   दारणा व गंगापूर धरणात रब्बी हंगामात सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाण्याची बचत झाल्याने तेरा टीएमसी,अर्थात साडेतिनशे ते चारशे दशलक्ष घनफुटाने अधिक आहे.दोन आवर्तने सहज देता येतील. असे असतानाही पाटबंधारे विभाग आवर्तने पिके उद्ध्वस्त झाल्यावर सोडणार का ? असा प्रश्न शेतकरी वर्गामधून विचारला जात आहे. जलद कालव्याच्या लाभक्षेत्राखालील पिकांना पाण्याची आवश्यकता आहे तर मग गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाण्याची आवश्यकता नाही का ?तेंव्हा सोमवारपासून जलद कालव्याबरोबरच गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांनाही पाण्याची आवर्तने सोडली जावीत. अन्यथा उभी पिके नष्ट होऊन कोट्यावधीचे नुकसान होणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे खात्याची राहील असा इशाराही श्री परजणे पाटील यांनी दिला.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page