संवत्सरचे सेवानिवृत्त शिक्षक डहाळे यांनी लिहिली १६३ दिवसात तुकाराम गाथा.
Tukaram Gatha in 163 days written by Dahale, a retired teacher of the year.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6April 2021, 14:20 :00
कोपरगाव: तालुक्यातील संवत्सर येथील रयतचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर यांनी १६३ दिवसात ४ हजार ५०० ओव्या असलेली तुकाराम गाथा हस्तलिखित पूर्ण केली असून देहू येथे त्याचे लोकार्पणही ते लवकरच करणार आहेत, त्यांच्या या उपक्रमाबद्दल नेवासे येथील जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख ह-भ-प उद्धव महाराज मंडलिक यांनी नुकताच त्यांचा नेवासे येथे सत्कार केला आहे.
ईश्वराने मनुष्य जन्म दिला. त्याचे सार्थक करण्याचे काम आपल्या हातात आहे. कलियुगात अशी बुद्धी प्रत्येकाला सूचावी असेही उद्धव महाराज मंडलिक याप्रसंगी बोलताना म्हणाले.
कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांचा गुरुमंत्र आणि संत ज्ञानेश्वर महाविद्यालय व प्रीतम प्रकाश महाविद्यालय पुणे येथील माजी प्राचार्य स्वर्गीय अशोक शिंदे यांची प्रेरणा घेत सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे यांनी लॉकडाउन काळात ज्ञानेश्वरीचे लिखाण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी१८ सप्टेंबर २०२० रोजी तुकाराम गाथा लिहायला सुरुवात करत २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुर्ण केली. प्रतिदिन 27 ओव्या ते लिहीत गेले व आता समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे लिखाण त्यांनी सुरू केले आहे.
ह भ प उद्धव महाराज मंडलिक पुढे म्हणाले की, जळी- स्थळी- काष्टी सर्वत्र ईश्वर व्यापलेला आहे. संतमंडळीच्या माध्यमातून ते संपूर्ण विश्वाला शिकवण देत आहेत. संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आणि लिहिलेली तुकाराम गाथा विश्वकल्याणासाठी सर्वोत्तम आहे, त्याचा ध्यास प्रत्येकाने घ्यावा. शिक्षक हा सर्वार्थाने संस्कारशील आहे. तो जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानसंपन्न करून जगायचे कसे याची प्रेरणा देतो, तद्वत रंगनाथ किसन डहाळे यांनी सेवानिवृत्तीनंतर अध्यात्म क्षेत्रातील लिखाणाला प्राधान्य देत स्वतःला त्यात गुंतून घेतले आहे. त्यांचा उपक्रम प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. या वेळी ह.भ.प. नंदकिशोर खरात, ह-भ-प रामनाथ पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. मुळे सर, प्रा. रामनाथ ननवरे, श्री. नाचण सर, भाऊसाहेब माळवे आदी उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना रंगनाथ डहाळे म्हणाले की, कोकम ठiण येथिल ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांनी आपल्याला जीवनाचा अध्यात्म सांगितला. त्यांचा सहवास हाच मला गुरूपेक्षा ही मोठा आहे, म्हणून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध हस्तलिखित पूर्ण करू शकलो. रंगनाथ डहाळे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.





