सरकारने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा -परजणे  

सरकारने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा -परजणे

The government should provide relief to the farmers by buying milk

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8April 2021, 20:00 :00

कोपरगांव : महाराष्ट्र राज्यात शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय सद्या अडचणीत सापडला आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तेंव्हा राज्य सरकारने बंद केलेली दूध खरेदी पुन्हा सुरु करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

राज्यात साधारणत: दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जात होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे दुधाची मागणी घटली. दूध उत्पादन खर्च आणि महागाईमुळे मोठी तफावत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला. सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संसर्गाची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. दुधाची मागणी देखील २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला. दोन तीन महिन्यात परिस्थिती थोडीफार सुधारलेली असतानाच पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने दुग्ध व्यवसायावर आता पुन्हा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. या व्यवसायाला बळ देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी परजणे यांनी केली असून या पत्राच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. सुनिल केदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page