आता लोहारे  प्लँटमधुन कोपरगांव-राहाता रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होणार -विवेक कोल्हे

आता लोहारे  प्लँटमधुन कोपरगांव-राहाता रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होणार -विवेक कोल्हे

oxygen supply to Kopargaon-Rahata hospitals from Lohare plant – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4May 2021, 18:40 :00

   कोपरगांव : संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे औद्योगिक क्षेत्राला पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लँट बंद होता. या प्लँटला मेडीकल ऑक्सिजन निर्मीती करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री मा.ना.राजेंद्र शिंगणे यांचेसह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पाठपुरावा करुन सदर प्लँटला मेडीकल ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली होती.

त्यानुसार सदरचा प्लँट कार्यान्वित झाल्याने कोपरगावातील कोपरगांव ग्रामीण रुग्णालयासह कोपरगांवातील इतर कोविड सेंटर असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहीती विवेक कोल्हे यांनी दिली आहे.         

  श्री कोल्हे पुढे म्हणाले की,राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांना विशेषत: ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांची व त्यांचे नातेवाईकांची प्रचंड हेळसांड झाली होती.लोहारे येथील प्लँटला  समक्ष भेट देऊन प्लँटचे संचालक श्री पोकळे यांचेशी मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सुरु करण्यासाठी काय अडचणी आहेत याची माहीती घेऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दुर करण्यासाठी प्रयत्न केले असून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मीती सुरु झालेली आहे.        

   सदर प्लँटसाठी सर्व मान्यता मिळाल्या मात्र लिक्कीड ऑक्सिजनची गरज असल्यामुळे लिक्विड ऑक्सिजन मिळावा यासाठी राज्याचे महसुलमंत्री मा.ना.श्री बाळासाहेब थोरात व आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रयत्न केल्यामुळे गोरगरीबांचे प्राण ऑक्सिजन विना जाणार नाही याची तातडीने खबरदारी घेतली त्याबद्दल या सर्व मान्यवरांचेही विवेक कोल्हे यांनी आभार मानले आहे.         

  वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स,नर्सेस तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेसह अनेक नेतेमंडळी कोरोनाशी दोन हात करत असून आपापल्या परीने कष्ट घेत आहे.सर्वांच्या सहकार्याने आपण नक्कीच कोरोनाला हद्दपार करु असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page