गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांची सरकारी कोविड सेंटरमध्ये सक्तीने भरती
Forced recruitment of corona patients in government evacuation center in Kovid Center
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10May 2021, 15:30 :00
कोपरगाव : गृह विलगीकरणाला (होम आयसोलेशन) प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली. या भूमिकेमागे सरकारचा हेतू चांगला असला, तरी गृह विलगीकरणात रुग्णांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे लक्षात आले आहे, रुग्ण वाढीचे हेदेखील एक कारण असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने थेट त्या-त्या गावच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधत कोरोना बाधित रुग्णांना थेट सरकारी कोविड सेंटरमध्ये सक्तीने भरती करण्याची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली .
रुग्णवाढीचा आलेख लक्षात घेऊन सरकारने कोव्हिड केअर सेंटर इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन सेंटरमध्ये दहा ते चौदा दिवस ठेवले जायचे. त्यांच्या जेवण, नाष्ट्याची व्यवस्था क्वारंटाइन सेंटरमध्येच केली जायची. त्यामुळे करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे समाजात वावरणे बंद व्हायचे, त्याचा परिणाम म्हणून करोना संसर्गाच्या फैलावावर नियंत्रण मिळवता आले होते. यंदा फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. दररोज रुग्णांची वाढती संख्या लक्षात येत आहे. दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने सरकारने क्वारंटाइन सेंटरऐवजी गृहविलगीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटर सुरू न करता लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सरकारच्या आदेशानुसार गृह विलगीकरणाची प्रक्रिया पाळली जात आहे. ज्या व्यक्तींनी गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे त्यांच्यापैकी काही अपवाद वगळता बहुतांश व्यक्ती गृह विलगीकरणातील करोनाचे नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्याचे जाणकारांचे मत आहे. गृह विलगीकरणातील व्यक्तीने चौदा दिवस घरातील एका खोलीत स्वत:ला अक्षरश: कोंडून घेतले पाहिजे. घरातील अन्य व्यक्तींच्या संपर्कात त्याने येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे, परंतु हा नियम पाळला जात नाही. गृहविलगीकरणातील व्यक्ती सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडतात, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांवर जातात, असे निरीक्षण काही जाणकारांनी नोंदवले आहे. बंद करण्यात आलेले क्वारंटाइन सेंटर व गृह विलगीकरणाचे पाळले जात नसलेले नियम यामुळे रुग्ण वाढ होत असल्याचे मानले जात आहे. अनेक ठिकाणी कोविड बाधित रूग्ण घरीच थांबतात. त्यामुळे संपुर्ण कुटूंबच बाधित होत आहेत. यामुळे मृत्यूचा धोका देखील वाढत आहे. तालुक्यातील कोविड केअर सेंटर येथे सुमारे एक हजार बेडची अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. स्थानिक कर्मचा-यांना न जुमानता गृह विलीनीकरणात राहणाऱ्या रुग्णांना कारवाईचा धाक दाखवताच त्यांनी सरळ कोविड केअर सेंटरची वाट धरली. रविवारी (९) रोजी पासुन तालुक्यातील चांदेकसारे, घारी, रवंदे आणि टाकळी या ग्रामपंचायतींना तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी आणि पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेटी देऊन कोविड बाधित असुनही घरीच थांबलेल्या रूग्णांना पोलिसांच्या मदतीने सरकारी कोविड केअर सेंटर येथे पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे .





