शेतकरी चिंतेत असून, जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा- सौ.स्नेहलता कोल्हे
Farmers are worried, start market committees in the district immediately – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Sun 30 May, 2021, 18:40 :00
कोपरगाव : बाजार समिती बंदमुळे शेतकरी चिंतेत असून, शेतमालाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कडक लॅाकडाउनमधून बाजार समित्यांना वगळून जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव ,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सकारात्मक निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.असेही त्या म्हणाल्या,
गेल्या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसासह कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती, मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे आणि शासनाच्या वारंवार बाजार समित्त्या चालू बंद करण्याच्या धोरणामुळे त्याच्या अडचणीत भरच पडलेली आहे. आता शासनाने बाजार समित्या चालू केल्या मात्र कांदा लिलाव अद्यापही जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्यांममध्ये बंद आहे.कांदा लिलावात गर्दी होऊन त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याचे कारण देऊन कांदा लिलाव बंद ठेवले आहे त्यामुळे शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सध्या पावसाचे दिवस आल्याने अजूनही बहुतेक शेतकरी बांधवांचे कांदा पीक सुरक्षित ठिकाणी कांदा चाळीत पूर्ण साठवलेले नाही ,वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे जर कांदा पीक भिजले तर त्यांना कोणीच वाली नाही त्यामुळे शासनाने त्वरित जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असल्याचे सौ. कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.