सोर्टेड सीमेन अत्यल्प दरात उपलब्ध करुन देण्याचा गोदावरी दूध संघाचा निर्णय – परजणे
Godavari Milk Team’s decision to make Sorted Semen available at very low rates – Parjane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :17.31
कोपरगांव : शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय आता शेतकऱ्यांच्या निगडीत झाल्याने हा व्यवसाय अधिक जोमाने वाढून अधिकाधीक दूध उत्पादन वाढावे हा दृष्टीकोन समोर ठेऊन गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ आणि बायफ संस्थेच्यावतीने सॉर्टेड सिमेनचा (कृत्रिम रेतन) पुरवठा अतिशय माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनाचा शास्त्रशुध्द पध्दतीने विकास करुन दूध व्यवसाय किफायतशीर व्हावा म्हणून काम करणारा गोदावरी दूध संघ व बायफ संस्था गेल्या ४० वर्षापासून कोपरगाव परिसरात एकत्रितपणे काम करीत आहे. कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी हातभार लावत आहे. बायफच्या दर्जेदार वळुच्या अनेक वर्षापासूनच्या सिमेन वापरामुळे दररोज सरासरी १५ ते १६ लिटर्स दूध देणाऱ्या हजारो संकरीत होल्स्टिन व जर्सी गाई कार्यक्षेत्रातील पशुपालकांकडे आज दिसत आहेत. बायफने तंत्रज्ञान वापरात त्याहीपुढे मजल मारुन नव्वद टक्के कालवडींची हमी असणारे सॉर्टेड सिमेन २०१६ साली अमेरिकेतून भारतात आणले व ते सर्वप्रथम गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात वापरण्यास सुरुवात केली. या सॉर्टेड सिमेनचा मान देशात सर्वप्रथम गोदावरी दूध संघास मिळाला. संघाचे संस्थापक स्व. नामदेवराव परजणे पाटील आण्णा यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून सन २०१६ सालापासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या सॉर्टेड सिमेनपासून आतापर्यंत ५५ ९ ३ गायींना कृत्रिमरेतन केले. त्यापैकी २३२८ गायींना गर्भधारणा झाली. त्यापासून १६७५ कालवडी जन्मास आल्या. कालवडींपैकी १४७ कालवडी मोठ्या होऊन दुधात आल्या आहेत. त्यांची दूध देण्याची दैनंदिन क्षमता २७ ते २८ लिटर्सपेक्षाही अधिक आहे. सॉर्टेड सिमेनपासून जन्मणाऱ्या कालवडींचे प्रमाण सुमारे ९ ० टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांकडील झपाट्याने वाढणारी गायींची संख्या व दूध उत्पादनात होणारी वाढ विचारात घेऊन गोदावरी दूध संघाने सॉर्टेड सिमेन वापरण्यासाठी केवळ प्रोत्साहनच नाही तर किंमतीमध्ये देखील सवलत दिलेली आहे. यापुढे सॉर्टेड सिमेन वापराचे प्रमाण वाढावे, त्याचा पशुपालकांना लाभ मिळावा यासाठी स्व. नामदेवराव परजणे अण्णा यांच्या नुकत्याच पार पडलेल्या १७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून संघाने शासनाच्या मदतीशिवाय स्वत: आर्थिक भार सहन करुन सद्या मिळणाऱ्या सॉर्टेड सिमेनच्या दरात मोठी कपात करुन संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना अवघ्या ४०० रुपयामध्ये ते उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सांगितले.