सेवा निवृत्तीकडे आयुष्यातील नवीन सुरुवात म्हणून पहा – आ. आशुतोष काळे
See retirement as a new beginning in life – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 26June :17:00
कोपरगाव : सेवा निवृत्त झाल्यांनतर सेवेची जबाबदारी कमी होणार आहे. मात्र सेवा निवृत्ती नवीन पर्वाची सुरुवात आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर आपण ज्या गोष्टी आजवरच्या आयुष्यात करू शकलो नाही, जे छंद जोपासले नाही, काही आवडी निवडी पूर्ण करू शकलो नाही या सर्व उणीवा भरून काढण्यासाठी निवृत्तीकडे आयुष्यातील नवीन सुरुवात म्हणून पहा असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात केले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे होते.
मागील वर्षीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यामुळे विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करता आला नाही त्या शेतकऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आज तोटामुक्त असून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. कारखाना आज संचित नफ्यात असून कारखान्याच्या प्रगतीमध्ये सर्वच घटकांचा वाटा आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील कर्मचारी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना निरोप देतांना मनात नेहमीच कुठतरी दु:ख वाटते मात्र निरोप देणे हि आपली संस्कृती असून त्यामुळे संस्कृती जपतांना निरोप घ्यावा लागत असला तरी यापूर्वीही आपण काळे परिवाराचे सदस्य होता व यापुढेही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसरी लाट येणार असे संकेत देण्यात आले आहेत. आजपर्यंत अनेक जवळच्या माणसांना कोरोनाने आपले लक्ष करून काहीना कायमचे आपल्यापासून हिरावून घेतले आहे. त्यामुळे यापुढील काळात कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण करून घेवून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा. आ. अशोकराव काळे, व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, पद्माकांत कुदळे, मीननाथ बारगळ, आनंदराव चव्हाण, अशोकराव तीरसे, सचिन चांदगुडे, राजेंद्र मेहेरखांब, हरिभाऊ शिंदे, डॉ. दत्तात्रय कोकाटे यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे ,सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त होणारे कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर आभार व्हा. सुधाकर रोहोम यांनी मानले. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य उपस्थित होते.