शिवसंपर्क अभियान सरकारने केलेले काम घराघरात पोहोचण्याची एक संधी- ना. शंकरराव गडाख
Shiv Sampark Abhiyan The work done by the government is an opportunity to reach households – Shankarrao Gadakh
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 13July 14:00
कोपरगाव : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आम्ही किती चांगले काम केले व करत आहोत हे सांगण्याची एक संधी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली असून ते शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविणार यात शंका नाही.असे गौरवोद्गार राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कोपरगाव कलश कार्यालय येथे शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते.
मंत्री शंकरराव गडाख पुढे म्हणाले, अनेक वर्षाच्या युतीने विश्वासघात केल्यानंतर जाहीरपणे बोलता येईना आणि कुणाला सांगता येईना, तेंव्हा नवीन प्रयोग करावयातून महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्री कोण? यावर खल सुरू असताना पक्ष चालविणे वेगळे आणि सरकार चालविणे वेगळे असे खुलेपणाने सांगणारे केवळ उद्धव ठाकरे हेच होते. या खोलातील राजकारणाचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला,
ना. गडाख पुढे म्हणाले, इच्छा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले ते केवळ तुमच्या आमच्या सर्वांमुळे पैशाचा हिशोब न करता आर्थिक मेळ बसत नसतानाही शेतकऱ्यांना २४ हजार कोटीची कर्जमाफी खुलेपणाने दिली. कोरोना काळात थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी न करता कोरोना आणि सरकार अशी दुहेरी भूमिका त्यांनी संयमीपणे पार पाडली, तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्व तयारी सुद्धा केली आहे. तेव्हा राज्यात नगर जिल्ह्याचे काम शिवसंपर्क अभियानातून एक नंबरचे व्हावे, कारण कोपरगावचे राजकारण राज्यात गाजलेले आहे विशेष म्हणजे मी या तालुक्यात प्रायमरी शिकत असतानाच येथील राजकारणाचे बाळकडू मला शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले नवे, जुने, राग, लोभ, हेवे, दावे बाजुला ठेवा,सर्वांनी एकत्रितपणे येवून काम करावे. राज्य शासनाच्या योजनांचा सामान्यांना फायदा झाला आहे. ती कामे जनतेपर्यंत पोहचवा. राज्याच्या योजना घराघरात पोहचवा. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा असे आवाहनही खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सपना मोरे, सुहास वहाडणे, डॉ. अजय गर्जे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव, सुनिल तिवारी, वर्षा शिंगाडे, आदीसह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक हजर होते.
प्रास्ताविक तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी तर स्वागत शहरप्रमुख कलविंदर दडियाल केले. सूत्रसंचालन रावसाहेब थोरात यांनी केले, व शेवटी आभार विधानसभा संघटक असलम शेख यांनी व्यक्त केले.





