कोपरगावमध्ये गोवंश कत्तलीसाठी आणलेल्या २० जनावरांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल
20 animals brought for slaughter in Kopargaon released, two charged
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 19:00
कोपरगाव : तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात काटवनात सोमवारी गोवंश कत्तलीसाठी आणलेल्या २ लाख ३६ हजार रूपये किमतीची २० जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका करून दोन जणांवर गुन्हे दाखल केले होते. यामुळे गोवंशाची तस्करी करणाऱ्यांच्या धाबे दणाणले होते.
शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुप्त बातमीदार यांच्या माहितीनुसार तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात खडक वसाहत काटवनात सोमवारी दुपारी १.१० वा.छापा टाकला असता गोवंश जातीची २० जनावरे कत्तली करण्यासाठी लपवून व बांधून ठेवलेली मिळुन आली.
पोलिसांनी २ लाख ३६ हजार किमतीची देशी, जर्सी गाई, वासरे, गो-हे अशी गोवंश जातीची २० जनावरे ताब्यात घेऊन गोकुळधाम गोशाळा, कोकमठाण येथे पाठवून दिली. याप्रकरणी आरोपी युनूस सिकंदर शेख (४४) रा. खडक वसाहत, डाऊच खुर्द व आरोपी अक्रम फकीर कुरेशी (३०) रा. संजयनगर कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले , सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत नागरे, स.फौ.शैलेंद्र ससाणे, पो. कॉ.राम खारतोडे, पो. कॉ. प्रकाश कुंढारे यासह अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.






