कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा; खावटी अनुदान योजनेंतर्गत आ. काळेंच्या हस्ते किराणा किटचे वाटप
Relief to the tribal brothers during the Corona period; Under the Khawati grant scheme. Distribution of grocery kits by MLA Kale
कोपरगाव : येथील कृष्णाई मंगल कार्यालयात गुरूवारी (२९जुलै) रोजी सकाळी १२वाजता आ. आशुतोष काळेंच्या हस्ते खावटी अनुदान योजनेंतर्गत कोपरगाव शहर व तालुक्यातील ७९ गावांमधील योजनेत पात्र २६४५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोख स्वरुपात २०००/- रूपये व २०००/- रुपयांचे किराणा किटचे वाटप करुन कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात आला आहे.
प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मंगेश औताडे, अमित आगलावे, सौ.छाया तांबे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आ. आशुतोष काळे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागल्यामुळे गोरगरीब नागरिकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरिता खावटी अनुदान योजना महाविकास आघाडी शासनातर्फे सुरू करण्यात आली. आदिवासी विभागामार्फत ही चांगली योजना राबविण्यात येत आहे. खावटी अनुदान योजनेच्या माध्यामातून शासनातर्फे होणारी मदत गोरगरीब लाभार्थींना मोलाची ठरणार आहे. खावटी अनुदान योजनेव्यतिरिक्त शबरी घरकुल योजना, मा.आयुक्त यांचेशी चर्चा करून तालुक्यांचे उद्दिष्ठ वाढवून घेतले आहे. ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत १५ गावांकरिता अंदाजे १.५० कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळावे व पडताळणी लवकर व्हावी तसेच समाज बांधवास वनहक्काचे दाखले तातडीने मिळणेबाबत व शासनाच्या इतर योजनाचा लाभ मिळावा याकरिता पाठपुरावा करू. अनेक योजना आहेत. त्या योजनांचासुध्दा आपण लाभ घ्यावा. गरजू लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्या, असे त्यांनी सांगितले.
या आदिवासी खावटी अनुदान किराणा किटमध्ये एक किलो मटकी,दोन किलो चवळी,तीन किलो हरभरा,एक किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, एक किलो उडीद डाळ,तीन किलो मीठ,अर्धा किलो गरम मसाला,एक लिटर शेंगदाणा तेल,एक किलो मिरची पावडर,अर्धा किलो चहा पावडर,तीन किलो साखर आदी पदार्थांचा समावेश होता.
चौकट
कोपरगाव नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासी भवन व आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान एकलव्य यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ ! – आ.आशुतोष काळे
यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, केएसके. कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवण, तहसीलदार योगेश चंद्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,रायुकॉंचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शहराध्यक्ष सुनील गंगुले, रोहिदास होन, नगरसेवक मंदार पहाडे,पं. स. सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, व लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





