गावतळी व बंधारे भरण्यासाठी गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने सोडा – राजेश परजणे
Leave Godavari canal at full capacity to fill villages and dams – Rajesh Parjane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 3 August 18:20
कोपरगांव : अहमदनगर जिल्हयात गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके सुकून चालल्याने पशुधन व शेतकऱ्यांचा विचार करता गावतळी व बंधारे भरण्यासाठी गोदावरी डावे-उजवे कालवे पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
गंगापूर, दारणा धरणांमधून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलेले आहे. सद्या गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहीत आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडलेले असले तरी ते पूर्ण क्षमतेने सोडलेले नसल्याने लाभक्षेत्रातील पिके जगण्याची आशा धुसर झालेली आहे. या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील बंधारे, गावतळे व ठिकठिकाणचे उद्भव अजून कोरडेच असल्याने विहिरी वै कुपनलिकांची पाण्याची पातळी खालावली आहे. खरीप पिकांसाठी पाणी नाही. अनेक ठिकाणी माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. याशिवाय पालखेड कालवा व एक्स्प्रेस (जलदगती) कॅनॉल अजून कोरडेच आहेत. या दोन्हीही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भूईमूग, उडीद, कापूस, कांदा आदी पिके पाण्यावाचून सुकून चालली आहेत. हाता तोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या आधी पालखेड व एक्स्प्रेस (जलदगती) कालव्यातून देखील पूर्ण क्षमतेने आवर्तने सोडण्याची नितांत गरज आहे. दुष्काळसदृष्य संकटातून शेतकऱ्यांना व पशुधनास वाचविण्यासाठी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडून गावतळी, बंधारे, केटीवेअर तातडीने भरुन देण्याबाबत तसेच पालखेड व एक्स्प्रेस कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश व्हावेत अशीही मागणी श्री परजणे यांनी मंत्री महोदयांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली.