धरणाचे पाणी नदीला ; कालवे कोरडे, खरीप पिकाची धूळधाण – सौ. स्नेहलता कोल्हे
Dam water to the river; Canals dry, kharif crop dust – Mrs. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 16:10
कोपरगाव : धरणात पाणी नाही म्हणून सिंचन नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही, अशी सामान्यत: ओरड होत असते. परंतु धरणात पाणी पुरेसे असतांना समन्यायी पाणी वाटपाची भीती दाखवून जायकवाडीच्या पाण्याची काळजी घेतली जाते. त्या नावाखाली आतापर्यंत पाच टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलेले आहे.कालवे मात्र भर पावसाळ्यात कोरडेच दिसत असून तालुक्यातील खरीप पिकांची धूळधाण झाली असून जवळपास ३० ते ४० गावातील शेकडो हेक्टर शेतीला पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तेंव्हा गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
सौ कोल्हे म्हणाल्या, गेल्या ७० दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची धूळधाण झाली आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यात घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. दारणा, गंगापूर धरने ७५ टक्के च्या पुढे भरले आहेत. पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने गोदावरी नदी भरून वाहत आहे. २५ हजार एकर शेत शिवार गोदावरी कालव्याच्या माध्यमातून फुलत असतो. पण डाव्या-उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात आले नसल्याने ते भर पावसाळ्यात कोरडेच दिसत आहे. पाटपाणी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला आहे. सौ कोल्हे म्हणाल्या, पावसाची ओढ, दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्याने पदरमोड करत पत्नीचे दागिने गहाण ठेवत कर्ज काढून उभी केलेली खरिपाची पिके पाण्याअभावी जळून जात आहे आता शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही कालव्याला पाणी सोडावे अशी सातत्याने आमची मागणी राहिली आहे आता शेतकऱ्यांचा दबावही वाढत आहे. दीड टीएमसी पाण्याची गरज गरज आहे मात्र पाटबंधारे कडून कडेवरचे सांभाळण्याच्या नादात गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने गोदावरी कालव्यांना खरीप पिकाचे पाण्याचे आवर्तन सोडून दिलासा द्यावा अन्यथा हा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा इशारा सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी दिला आहे. चौकट ज्यांच्याकडे गोदावरी कालवे पाटपाण्याची जबाबदारी आहे ते मात्र नगरपालिकेच्या आरोप-प्रत्यारोप गर्क आहेत, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची वाताहात झाली, तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नाही, असे सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.