गोदावरी कालव्याद्वारे खरीप पिकांसाठी तातडीने आवर्तने सोडावीत – परजणे

गोदावरी कालव्याद्वारे खरीप पिकांसाठी तातडीने आवर्तने सोडावीत – परजणे

For kharif crops through Godavari canal should be released immediately-Parajane

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 16:45

कोपरगांव :गेल्या एक दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. वारंवार मागणी करुनही पाटबंधारे विभागाने शेतीची आवर्तने वेळेवर न सोडल्याने हाता तोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. जी काही पिके अजून तग धरुन आहेत अशा पिकांना पाटपाणी मिळाले तर शेतकऱ्यांना थोडा आधार मिळू शकतो ही गरज लक्षात घेवून पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे तातडीने आवर्तने सोडावीत अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरु झालेला असला तरी मध्य महाराष्ट्रात व प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्हयात पाऊसच पडलेला नाही. उर्वरीत दोन महिन्यात पाऊस पडेलच याचीही शाश्वती नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास येणारा रब्बी हंगाम सुध्दा धोक्यात येऊ शकतो. हे भयानक संकट लक्षात घेवून शासनाने नाशिक भागातल्या धरण क्षेत्रातील पाणलोटासह लाभक्षेत्रात तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा अशी विनंती मी वारंवार केलेली आहे. परंतु शासनाकडून दखल घेतली गेली नाही. सुरुवातीला पडलेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतक-यांनी कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग, तूर, मूग पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु आता पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. पाटबंधारे विभागाने कालव्याद्वारे पाणी सोडून लाभक्षेत्रातील शेती पिकांसह गावोगावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, गावतळे, बंधारे, ओढे, नाले भरुन दिल्यास माणसांसह शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन शासन शेतकऱ्यांना वेठीस धरीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोदावरी कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तने सोडून शेतीचे भरणे झाल्यानंतर उर्वरीत पाण्यातून गावोगांवच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, गावतळे, बंधारे, ओढे, नाले भरुन दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. म्हणून या गंभिर परिस्थितीचा विचार करुन आवर्तने सोडण्याबाबत संबंधित पाटबंधारे विभागास निर्देश करावेत अशीही मागणी श्री परजणे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page