कोरोनामुळे ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला; सकारात्मक प्रतिसाद
Corona to the concept of ‘One Village One Ganpati’; Positive response
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 28 August 10:20
वाचा सविस्तर !
कोपरगाव: प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे यंदा सार्वजनिक ऐवजी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचा भर आहे. यातूनच पोलीस प्रशासनाने शुक्रवारी(२७)रोजी सायंकाळी सात वाजता शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
विघ्नहर्त्या गणरायाचे अवघ्या पंधरा दिवसात आगमन होणार आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे यंदा गणेशोत्सवात शासनाने खूपच निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक गावांची ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुजविण्याची मानसिकता झाली आहे.
शहर व ग्रामीण भाग मिळून साधारणता सार्वजनिक गणेशोत्सव अडीचशे पेक्षा अधिक मंडळे उत्सव साजरा करतात. यावर्षी नगरपालिका निवडणुका असल्याने मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु कोरोनामुळे असलेले निर्बंध, तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या खूपच मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घेऊन काळजी घ्यावी लागेल . पंधरा दिवसावर आलेल्या उत्सवाची तयारी दिसून येत नाही. प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा सार्वजनिक ऐवजी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचा भर आहे. यातूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे येत आहे. उत्सवावर असलेले निर्बंध व कोरोना तिसऱ्या लाटेची भीती पाहता विविध मंडळाचे कार्यकर्ते बॅकफूटवर आले आहेत. मंडळाच्या बैठका व कार्यकारिणीचे सोपस्करही अनेक मंडळांकडून अद्याप करण्यात आले नाहीत. त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पनाच बहुतेक गावांमध्ये स्विकारली जाऊ शकेल. पोलीस प्रशासनाने याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसातच चित्र स्पष्ट होईल. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या काही गावांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता दिसत नाही.
या बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सपोनि भरत नागरे, वीज मंडळाचे अधिकारी नगराध्यक्ष विजय वहाडणे, नगरसेवक शांतता कमिटी सदस्य,पक्षीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळ अध्यक्ष, सदस्य व मंडप व्यावसायिक यांची बैठक घेवुन त्यांना महाराष्ट्र शासन,गृह विभाग यांच्या कडील सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ संदर्भात प्राप्त परीपत्रकानुसार योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.