लोककल्याणातुन गौतम बँकेची प्रगतीकडे वाटचाल – आ.आशुतोष काळे
Gautam Bank’s progress through public welfare – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 30 August 19:00
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या गौतम बँकेने प्रतिकूल व कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील लोककल्याणातुन प्रगतीकडे वाटचाल ठेवली असल्याचे गौरोद्गार आ. आशुतोष काळे यांनी गौतम बँकेचा ४६ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले. सभेस माजी आमदार अशोकराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी बँकचे चेअरमन बाबासाहेब कोते होते.
आ. काळे म्हणाले की, सहकारात सभासद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सभासदांनी बँकेत व्यवहार करून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या पाहिजे. कर्ज व्यवहार, बँकेने उपलब्ध करून दिलेली लॉंकर या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. घेतलेल्या कर्जाचा विनियोग चांगल्या कामासाठी करून कर्ज वेळेत फेडावे. बँकेने या आर्थिक वर्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून कोवीड-१९ चे जागतिक संकट काळात देखील तालुक्यातील आर्थिक ऊलाढालीस मदत केली हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.बँकेचा कारभार अतिशय चांगला असल्यामुळे बँकेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळत असून बँकाच्या एकूण सात शाखांचा कारभार पारदर्शकपणे सुरु आहे. दि.३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेच्या ठेवी १०० कोटीच्या पुढे गेल्या असून कर्ज वाटप ६२ कोटीच्या पुढे आहे. गुंतवणूक ४७.६५ लाख असुन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१ अखेर बँकेला ८७.७८ लाख रुपये नफा झाला आहे.बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून सभासदांना लाभांश देण्यास बँक सक्षम आहे परंतु कोवीड १९ चे अनुपालन व रिझर्व बँकेच्या निकषावर सभासदांना लाभांश देता येत नाही याची खंत आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
सूत्रसंचालन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी मानले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, सुंदरराव काळे, बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कुक्कुटपालनचे व्हा. चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, मॅनेजर बाळासाहेब काळे, सुरेश पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बँकेचे अनेक सभासद आँनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.