देशातील खासदार आणि आमदारांना पेन्शन देणे बंद करावे- संजय काळे
Stop giving pensions to MPs and MLAs in the country- Sanjay Kale
पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी काळेंची शिर्डी ते दिल्ली १३०० किमी सायकलवारी Kale’s Shirdi to Delhi 1300 km cycle ride for PM Modi’s visit
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue14sep 2021, 19:40Pm.
कोपरगाव : कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे शिर्डी ते दिल्ली सायकलवरून प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देशातील खासदार व आमदार यांना पेन्शन देणे बंद करावे, ही मागणी करणार आहेत. यासाठी त्यांनी पत्राद्वारे डिसेंबरमध्ये पंतप्रधानांची भेट मागितली आहे.
संजय काळे यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की पाच वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर पक्षाने अगर जनतेने नाकारले तरीही संबंधित लोकप्रतिनिधीला आयुष्यभर पेन्शन मिळते. शिवाय कर्मचाऱ्यांकडून जशी पगारातून कपात करून घेतली जाते, तशी कपात लोकप्रतिनिधींकडून केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या पेन्शनसाठी नागरिकांच्या कराच्या पैशातून खर्च का करायचा? असा मुद्दा काळे यांनी उपस्थित केला आहे. संजय काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, खासदार आणि आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनचा फेरविचार करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांसाठी जी पेन्शन योजना आहे, त्यामध्ये नोकरीत असताना पगारातून विशिष्ट रक्कम कपात केली जाते. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ नोकरी करून निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन मिळते. मात्र लोकप्रतिनिधींना त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीनंतर व सुविधा सह पेन्शन सुरू केली जाते. भला मोठा आर्थिक ताण सरकारी तिजोरीवर दिवसेंदिवस पडत असून याला कुठेतरी पायबंद घालण्याची गरज आहे. संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात खासदार व आमदार यांना दिलेल्या दिल्या जाणाऱ्या पेन्शनची माहिती घेतली असून त्यासाठी सरकारला द्यावे लागणारे व्याज याचीही त्यांनी आकडेवारी घेतली आहे. लोकप्रतिनिधींना अशा पेन्शनची गरज असते का? त्यामुळे याचा फेरविचार करावा, याबाबत संपूर्ण अभ्यास करून त्यांनी ११ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिसेंबर महिन्यात भेट मागितली आहे. भेट ठरल्यानंतर ते सायकलवरून शिर्डी ते दिल्ली हा १३०० किलो मीटरचा प्रवास ते करणार आहेत. या प्रश्नाकडे देशातील नागरिकांनाही या गोष्टी समजाव्यात यांच्या लक्षात याव्यात यासाठी त्यांना पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यायची आहे.





