शहरात ३ कोटी ८५ लाखांची विकास कामे, युद्धपातळीवर सुरु करा पालिका प्रशासनाला आ.काळे यांचे निर्देश
MLA Kale’s instructions to the municipal administration to start development works worth Rs 3.85 Lakh
रस्त्यासह विविध कामांचा समावेश Involvement of various works including road
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 16:00Pm.
कोपरगाव: शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या रस्ते आणि विविध विकासकामांच्या ३ कोटी ८५ लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी (दि.१५) रोजी प्रशासकीय मान्यता दिली असून तुमच्या स्तरावरील सोपस्कार पूर्ण करून आता शहरात ३ कोटी ८५ लाखाच्या विकास कामांची युद्धपातळीवर सुरुवात करा, असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत .
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडे सातत्याने पाठपुरावा करून यापूर्वी शहरातील रस्ते व विविध विकासकामांना ५ कोटी रुपये खर्चास नगरविकास मंत्रालयाने मंजुरी दिली होती. आज त्यापैकी शहरातील विकासकामांच्या ३ कोटी ८५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात कोपरगाव नगरपरिषद इमारती समोरील उद्यान विकसित करणे, संरक्षक भिंत बांधणे, प्रभाग क्रमांक १ मधील खडकी येथील खरे घराजवळील नाल्यावर सीडी वर्क करणे, खैरनार घराजवळ सीडी वर्क करणे, खडकी ते मदरसा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २ मधील संदीप शिरोडे घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपरिषद हद्दीतील लुंबिनी बुद्धविहारकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ मधील नगर मनमाड हाय वे ते साईधाम मार्ग डांबरीकरण करणे, एस. एस. जी.एम. कॉलेज समोरील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ६ मधील आचारी हॉस्पिटल ते छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, पंचायत समिती ते आठरे बंगला रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ९ मधील छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल ते धरणगाव रोड नागरे पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे आदी विकासकामांचा सामावेश आहे. असे त्यांनी सांगितले. कोपरगाव शहरात चांगले रस्ते व सुशोभिकरण असलेले शहर निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून यापुढेही जास्तीत जास्त निधीसाठी मी प्रयत्न करणार आहे.असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे .