श्री साई संस्थानचे नवे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे
Shree Sai Sansthan new president MLA Ashutosh Kale
पुन्हा एकदा शिर्डी कोपरगाव तालुक्यात आलीOnce again Shirdi came to Kopargaon taluka
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 10:30Pm.
कोपरगाव : श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश सावंत यांची वर्णी लागली आहे .
साई संस्थानच्या अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे यांच्या निवडीच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यापासून वेगळी झालेली शिर्डी पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यात आली आहे ,
साई संस्थान चे नवे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे हे माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांचे नातू तर माजी आमदार अशोक काळे यांचे द्वितीय चिरंजीव आहेत.
गुरुवारी (१६) रोजी रात्री जाहीर झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह बारा जणांच्या विश्वस्त मंडळांमध्ये अध्यक्ष आमदार आशुतोष अशोकराव काळे, उपाध्यक्ष ॲड. जगदीश हरिश्चंद्र सावंत, हे असून सदस्यपदी अनुराधा गोविंदराव अदिक,ॲड. सुहास जनार्दन आहेर, अविनाश अप्पासाहेब धनवटे,सचिन रंगराव गुजर,राहुल कनाल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे,जयंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर, सभापती, शिर्डी नगर पंचायत यांचा समावेश आहे.
गुरुवारी साई संस्थान विश्वस्त मंडळाची यादी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या विविध नावांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. परंतु यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत त्यात शिर्डी साई संस्थान चे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यामुळे कोणाची वर्णी लागणार यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा व शंकरराव काळे घराण्याचा स्नेह फार जुना आहे. शरद पवार सक्रिय राजकारणात व्यस्त असताना रयत शिक्षण संस्थेची धुरा गेली अनेक वर्ष कर्मवीर शंकरराव काळे यांनी सांभाळली होती.
अशोक काळे यांनी शिवसेनेतून दोनदा आमदारकी मिळवली असल्यामुळे राष्ट्रवादी आणि रयत पासुन ते थोडे दूर गेले होते त्यांनी कधी रयत संस्थेच्या मोठ्या पदाचा आग्रह धरला नाही, आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकी मिळविल्यानंतर कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्नेहातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हुशार व चाणाक्ष व उच्च शिक्षा विभूषित आमदार आशुतोष काळे यांच्यावर वर्षभरापूर्वी रयत संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती, त्यांनी रयत मध्ये अल्पावधीत केलेल्या कामामुळे जागतिक दर्जाच्या साई संस्थान च्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने युवा आमदार आशुतोष काळे यांना संधी दिल्याचे बोलले जाते. आमदार या नात्याने कोपरगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी, कोसाका उद्योग समूह, रयत शिक्षण संस्था व जागतिक दर्जाच्या साई संस्थान अध्यक्षपद अशा मोठ्या पदांची जबाबदारी युवा आमदार आशुतोष काळे यांच्यावर अल्पावधीतच आली आहे. एकेकाळी कोपरगाव तालुक्याचे वैभव असलेली शिर्डी कोपरगाव पासून वेगळी झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने प्रथमच कोपरगाव तालुक्याला साई संस्थांचे अध्यक्षपद मिळाले आहे. आज खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्याला न्याय मिळाला आहे.





