दिलजमाई झाली आहेच तर निळवंडे चे पाणी शहरात येण्यासाठी असेच एकत्र रहा!
If you are satisfied, stay together to get the water of Nilwande to the city!
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed22sep 2021, 16:30Pm.
कोपरगाव : शहरातील २८ कामांच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोपांच्या लाखोली वाहणाऱ्या मध्ये आठ दिवसात दिलजमाई होऊ शकते तर मग कोपरगाव शहराच्या ज्वलंत पाणी प्रश्नासाठी ही दिलजमाई का ? होऊ नये, दिलजमाई झाली आहेच तर निळवंडे चे पाणी शहरात येण्यासाठी अशीच राहू द्या,!
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उंबर्या पर्यंत आणले आहे आमदार आशुतोष काळे यांनी आता ते शहरात आणावे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हा ज्वलंत आहे तेव्हा पाणी कोठूनही यावे, ते येणे महत्त्वाचे आहे. साठवण तलाव झालाच पाहिजे हे सत्य आहे परंतु विनासायास साई बाबाच्या कृपेने बंद पाइपलाइनमधून निळवंडे चे पाणी कोपरगाव मध्ये येणार आहे तर त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. साठवण तलावासाठी ११५ कोटी चा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे परंतु सरकारची आजची परिस्थिती पाहता कोपरगाव सारख्या एका नगरपालिकेला केवळ साठवण तलावासाठी ११५ कोटी शासन देईल असे आज तरी दृष्टिक्षेपात नाही तेंव्हा श्रेयवादात अडकून न पडता उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. तेव्हा यावर किंतु परंतु न करता विद्यमान लोकप्रतिनिधीने निळवंडे बंद पाईप पाणी योजना पूर्णत्वाकडे नेऊन ते पाणी कोपरगाव शहरात आणावे व कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरुपी संपुष्टात आणावा. आपले बारामही कालवे बंद झाले आपल्या जमिनी घेऊन सरकारने कालवे बंद केले समन्यायी वाटपाच्या नावाखाली आपल्या हक्काचे पाणी जायकवाडी भरण्यासाठी वापरले जाते परंतु आपल्याला पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी मागणे हा आपला हक्क आहे तो कसा कोठून सोडवायचा हा प्रश्न सरकारचा आहे याचा विचार आपण न करता बेगडी सहानुभूती न दाखवता कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी राजकारण बाजूला ठेवून शुद्ध हेतूने कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाकडे पाहावे व कोणत्याही प्रकारचा खोडा न घालता सहकार्याची भूमिका ठेवावी, विनंती आहे की तथाकथित जलतज्ज्ञांनी याबाबत आपले मत प्रकट करून अकलेचे तारे तोडू नयेत, राज्यात कोपरगाव तालुका हा साखर पट्टा समजला जातो. हा अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत तालुक्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज आहे. पर्जन्य छायेखालील पट्टा म्हणून इंग्रजांनी या भागाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी दूरदृष्टीतून धरणांची गोदावरी कालव्याची निर्मिती केली वाढती कारखानदारी वाढती लोकसंख्या यामुळे धरणातील पाण्यावर आरक्षण वाढत गेले परिणामतः बारामाही चालणारे कालवे बंद झाले त्यात उरली सुरली कसर समन्यायी कायद्याने भरून काढली हक्काचे पाणी तर गेलेच पण आवश्यक असणारे पाणी मिळेनासे झाले आहे. तीन ते चार महिन्यांनी कालव्याचे आवर्तन सुरू होऊ लागल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष भासू लागले कोपरगाव शहराला चार ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळू लागले. मोठी शहरे असोत की औद्योगिक वसाहती आधी पाणी आणि नंतर विकास परंतु आजघडीला कोपरगावचे मात्र उलटे झाले आहे कोपरगावचा सर्वांगीण विकास होत असताना कोपरगाव हे मोठे शैक्षणिक, धार्मिक व आर्थिक केंद्र तसेच देशातील कोणत्याही कोपऱ्यातला माणूस येऊ शकणारे असे मध्यवर्ती रेल्वे व रस्ते वाहतूक केंद्र बनले आहे आजघडीला सातत्याने वाढणारे व विकसित होणाऱ्या कोपरगाव शहरासमोर सर्वात महत्त्वाचे पाण्याचे आव्हान आहे कोपरगावची अर्थव्यवस्था कृषी व कृषीला पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी, देण्याची अधिक गरज आहे. शिवाय उद्योगांच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे. आपल्या शहराचा व तालुक्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन ज्यावेळी एकत्र येतात त्यातून विकास घडतो जोडीला सर्व नगरसेवक, प्रशासन खंबीरपणे उभे राहिले तर पाण्याची ही लढाई आम्ही जिंकू, सरकार निधी देत असत; मात्र या निधीचा सदुपयोग करताना पैसा वापरणारा सुद्धा तेवढाच खंबीर असावा लागतो. हे श्रीरामपूर नगरपालिकेने दाखवून दिले. निधी मंजुर केल्यानंतर सर्वच कामे होतात असे नाही. ती कामे करून घेण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते आणि ही दूरदृष्टी श्रीरामपूर नगरपालिकडे असल्याने हे शक्य झाले, कोपरगावचा विकास करण्यासाठी सर्वांनी आजच्यासारखे एकत्र यावे. नगराध्यक्ष म्हणून शहराला नवीन स्वरूप देत असताना जनतेला दर्जेदार सुविधा देतील,अशी मतदारांची अपेक्षा होती. ती किती फलद्रूप झाली हे जनताच सांगू शकेल परंतु आज हा मुद्दा नाही आज मुद्दा आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आहे. दिलजमाई झाली आहेच तर निळवंडे चे आणण्यासाठी असेच एकत्र का नको ! असे या निमित्ताने विचारण्याचा मोह टाळता आला नाही म्हणून हा शब्द प्रपंच केला आहे यात कोणाला दुखावण्याचा प्रश्न नाही एक शहरातील नागरिक म्हणून शहरातील जनतेसाठी पिण्याचे पाणी मिळावे हीच एक तळमळ!





