पोकळ आरोळ्या आणि चारोळ्यात दंग असणा-यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – योगेश बागुल

पोकळ आरोळ्या आणि चारोळ्यात दंग असणा-यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – योगेश बागुल

  • शहरातील विकास कामाच्या उद्घाटनावरून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप

कोपरगाव :
‘पोकळ आरोळ्या आणि चारोळ्यात’ दंग असणा-यांनी त्यांच्या ज्ञानाचे गाठोडे सांभाळावे, आम्ही राजकारण न करता शहर विकासासाठी निधी आणला, निवडून आल्यापासून  ज्यांनी केवळ द्वेषाचे राजकारण केले. त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये,’ अशा शब्दांत शिवसेना गटनेते तथा उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी नाव न घेता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर तोफ डागून जशास तसे उत्तर दिले.

गुरुवारी (९ जुलै) रोजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याविरोधात एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

‘आजपर्यंत ज्यांनी केवळ व्यक्ती व्देषाचेच राजकारण केले त्यांनी आम्हाला उच्च प्रतीचे राजकारण शिकवू नये`शहरातील विविध कामांच्या उद्घाटनावरून नगराध्यक्ष विजय वहाडणे व उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्यात पत्रकातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत.

योगेश बागुल म्हणाले, बहुमत असताना आजपर्यंत राजकारणाचा विचार न करता जनहितासाठी आम्ही त्यांना संमती देत आलो आहे. चार वर्षात आमच्या नेत्यांनेही कधी आम्हाला विरोध करायला भाग पाडले नाही. असे असतानाही नगराध्यक्ष  वहाडणे हे केवळ व्यक्ती व्देषाच्या राजकारणातून  कायम त्यांच्याविषयी गरळ ओकतात तेंव्हा त्यांच्या राजकारणाची पातळी कोणती ? हाही प्रश्न माझ्या सह कोपरगावकरांच्या मनात निर्माण होत असल्याची टीका बागुल यांनी  पत्रकातून केली आहे .

ज्ञानाचे गाठोडे असलेले नगराध्यक्ष वहाडणे हे आदरणीय आहेत. त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही.पण ते थेट आमच्या प्रामाणिक भूमिकेवरच बोललेत, तेंव्हा दु:ख झालं. तेव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं योगेश बागुल म्हणाले.

तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. शहरातील प्रलंबित कामे केली. यावेळी निमंत्रण देऊनही भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी थातूरमातूर कारणे देऊन, नगराध्यक्ष वहाडणे यांनी सातत्याने येण्याचे टाळून मनातील आकसापोटी मला काम करू दिले जात नाही. असे तुणतुणे वाजवून  मा आ. सौ. कोल्हे यांना सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होत. असा घणाघाती आरोप बागुल यांनी पत्रकातून केला आहे. हे  सर्व  कोपरगावकरांना  आठवत असल्याने ते अशा राजकारणाला बळी पडणार नाही असे  योगेश बागुल यांनी म्हटलं आहे.

 नगराध्यक्ष निवडणुकीत कोपरगावकरांना विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या वहाडणे यांनी किती निधी  आणला  व किती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली आहेत. हे आता जनतेला सांगावे, असे थेट आवाहन पत्रकाच्या माध्यमातून योगेश बागुल यांनी वहाडणे यांना दिले.

ज्यांनी कोट्यावधी आणला त्यांचा तिरस्कार, पण ज्यांनी दमडी दिली नाही, त्यांचा उदोउदो करणे हेच का आपले राजकारण ? असा खोचक सवाल बागुल यांनी केला.

आम्ही जनतेच्या प्रति प्रामाणिक आहोत जनतेवर आलेल्या संकटाच्या वेळी आम्ही पुढे असणारी माणसे आहोत. आपण मात्र केवळ पोकळ आरोळ्या आणि चारोळ्या यातच दंग असतात त्यावेळी आपल्याला जनतेशी अशी काही घेणेदेणे नाही. प्रत्येक वेळी केवळ कोल्हे यांच्या नावाने ओरडून आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहात. परंतु जनता सुज्ञ आहे. आपल्या उच्च प्रतीचे राजकारणात त्यांना कळत नाही. हा गोड गैरसमज आपण मनातून काढून टाका, अशा शब्दात उपनगराध्यक्ष बागुल यांनी पत्रकातून नगराध्यक्ष वहाडणे यांचा नाव न घेता खरपूस समाचार घेतला आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page