कोपरगावात दोन दिवसात २ इंच पाऊस; पावसाचा जोर राहिल्यास पुराचा धोका, प्रशासनाने दिला इशारा
2 inches of rain in two days in Kopargaon; Extreme levels of flood danger were announced in at least two places
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu28sep 2021,19:00Pm.
कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील घरणे भरलेली असलेल्या गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. दोन दिवसापासून तालुक्यात ५५ मिलीमीटर पाऊस (२ इंच पाच मिलिमीटर पाऊस) पडल्याची नोंद जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर झाली आहे. अंदाजानुसार पाऊस झाला तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरावरील गुलाब चक्री वादळाचा परिणाम कोपरगाव तालुक्यापर्यंत पोहचला आहे. सोमवारी (२७) रात्रभर सतत धार कोसळणाऱ्या पावसाने तर मंगळवारी (२८) दुपारी साडेतीन पावणे चार वाजेच्या सुमारास पासून चांगलाच जोर धरला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ८४ टक्के भरले आहे दरम्यान नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २० हजार ४०० क्यूसेक्स तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय जल आयोगाचे कोपरगाव केंद्राचे साईड इन्चार्ज संजय पाटील यांनी दिली सद्यस्थितीला गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी दोन मीटर आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये संततधार पाऊस फोडत आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि ओढे नाल्यांना पूर आला आहे. निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल होत आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता वीस हजार चारशे क्यूसेक्स सुरु करण्यात आला. गोदावरी नदीपात्रातून जवळपास ३५ ते ४० टीएमसी पाणी वाहून गेल्याने जायकवाडी धरण ८४ टक्के भरले आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे. पुढील दोन/ तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतात काम करू नका, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे. पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्त्रोताजवळ विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व प्रमुख धरणे भरलेली असल्याने पावसाचे पाणी थेट नदीत सोडले जाणार. पावसाचा असा जोर असाच चालू राहिला तर पुराचाही धोका आहे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. अपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हवामान विभागाने नगर जिल्ह्यात २८ आणि २९ सप्टेंबर रोजी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविलेली आहे. अहमदनगर जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या अंदाजानुसार पाऊस आल्यास नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.