पावसामुळे खरीप पिके फळबागा व घरांचे नुकसान झालेल्यांना मदत देऊन आधार द्या – परजणे
Support those whose kharif crops, orchards and houses have been damaged due to rains
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,18:00Pm.
कोपरगांव : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके ,फळबागा अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. याचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
कोपरगांव तालुक्यातील ओढ्या नाल्यावरील छोटे मोठे के. टी. वेअर्स, शेततळी, गांवतळी तसेच शेतातील चर तुडुंब भरुन वाहत आहेत. उभ्या शेतपिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली आहेत. काढणीला आलेले सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, तूर, उडीद, मूग, भूईमूग पिके वाया गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, मुलांची पुस्तके, वह्या अशा संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर पडले आहेत. आधारासाठी जागा नसल्याने अनेकांना उघड्यावर पावसात जीवन व्यथीत करण्याची वेळ आली आहे. जनावरांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या आहेत.भाजीपाला पिके अक्षरश: सडून गेली आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यावधी नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पीक विमा उतरवलेला असताना बऱ्याच शेतकऱ्यंना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. तरीही कर्जे काढून यंदा शेतीचे नियोजन केलेले असताना अतिवृष्टी आणि पुरामुळे पुन्हा शेतक-यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. या आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही. नुकसान झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, मा. गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबत सूचना देवून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशीही मागणी श्री परजणे पाटील यांनी केली. निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री, मा. कृषी मंत्री, मा. महसूल मंत्री यांनाही पाठविल्या आहेत.