समन्यायी पाणी वाद : आम्हाला सम न्याय हवा आहे, असं कोपरगावचे लोक का म्हणताहेत?
Equitable Water Dispute: Why do the people of Kopargaon say that we want equal justice?
गोदावरी कालवे लाभधारकांच्या मदतीला शिवसेना Shiv Sena to help Godavari canal beneficiaries
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 5 Oct 2021, 16:30Pm.
कोपरगाव : २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला. मात्र तत्कालीन सरकारने न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे मेंढेगिरी समितीची स्थापना केली होती. समितीने पाणीवाटपात संशोधन सुचविताना पाणीवाटप प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात यावे, किमान तीन वर्षात नियोजनाचे अवलोकन करण्यात यावे त्रुटी असल्यास सुधारणा करावी असे स्पष्ट नमूद केले आहे. अहवालात असंख्य त्रुटी आहेत. तसेच समितीमधील सदस्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असल्याचे खुद्द मेंढेगिरी यांनी अहवालात म्हटले आहे. तेंव्हा सर्वसमावेशक नवीन समिती गठीत करून नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष टाळावा यासाठी कोपरगावकर यांच्या वतीने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितली आहे.अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी मंगळवारी(५) रोजी १२ वाजता शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शिवाजी ठाकरे म्हणाले, मराठवाड्यातील २९ आमदारांच्या दबावाला बळी पडून तात्कालीन सरकारने अपरिहार्यतेने अनेक दोष व त्रुटीं असलेला मेंढेगिरी अहवाल स्विकारून नाशिक नगर गोदावरी खोऱ्यातील लाखो लाभधारक शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. गंगापूर व दारणा धरणातून १३ टीएमसी पाण्यातून सन २०१८-१९ या वर्षात ४८ कोटीची महसूल मिळविला तर गेल्या तीन जायकवाडीतून १५० टीएमसी पाणी वापरले गेल्याचे गृहीत धरल्यास शासनास पाचशे ते सहाशे कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित होते, परंतु अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पाणी विक्री करून शासनाचा महसूल बुडवला आहे. याची चौकशी होऊन अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा, जायकवाडी प्रकल्पातून या वर्षात शेती, उद्योग व पिण्याचे पाणी याचा किती वापर झाला व त्यातून शासनाने किती महसूल मिळाला याची स्वतंत्र समिती नेमून ऑडिट करण्यात यावी. अधिकारी लोक सरकारला चुकीची माहिती देतात.आपले सरकार असताना प्रत्येक वेळी न्यायालयात जायची काय आवश्यकता आहे? सर्वसामान्य माणसाला हे परवडणारे नाही. उद्धव ठाकरे हे आमचे मातोश्रीत बसलेले पांडुरंग आहेत तेव्हा आमच्या प्रश्नासाठी कोपरगाव येथून सर्व पक्षांची कोपरगाव ते मुंबई जल दिंडी काढून त्यांना भेटू त्यांच्यासमोर शेती तज्ञ, पाणी तज्ञ, जलतज्ञ यांची बैठक घेऊ असे शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. प्रश्न पाण्याचा आहे श्रेयाचा किंवा पक्षाचा नाही तेंव्हा आमच्या जलदिंडीत काळे, कोल्हे, विखे सर्वांनाच आमंत्रण आहे.
जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, समन्यायी पाणी वाटप ठरले आहेत तर मग पाणी द्या, पण ते मोजून द्या, यासाठी दारणा, गंगापूर, प्रवरा, मुळा या धरणावर मीटर बसवा त्यातून मोजून ६५ टक्के पाणी जायकवाडीला सोडा ते त्यांनी नदीतून, हवेतून का रेल्वेतून न्यायचे हे त्यांचे त्यांनी ठरवावे. खरिपात पिकांना पाणी मिळाले नाही खरीपाची पिके गेल्याने आमच्या डोळ्यात पाणी आले किती टीएमसी पाणी डोळ्यादेखत गोदावरीतून वाहून जात होते, जायकवाडी पर्यंत गोदावरी नदीच्या कडेने पंधरा ते वीस हजार दहा अश्वशक्तीच्या मोटारी २४ तास चालू असतात या पाण्याचा हिशोब कोणी घ्यायचा याबद्दल अधिकाऱ्यांना का जाब विचारला जात नाही ? आम्हाला ७ नंबर फॉर्म भरू दिला जात नाही,भरला तर तुमचे फॉर्म रद्दबादल केल्याचे खरीप हंगाम संपल्यानंतर कळवले जाते, ही कुठली पद्धत एकीकडे समन्यायी पाणी वाटप म्हणायचे, आम्हाला खरिप पिकांना कालवे सोडायची नाही दुसरीकडे नदीला पाणी सोडून बेकायदेशीर प्रचंड उपसा होऊ द्यायचा हा कुठला समन्यायी कायदा, “आमचे कालवे बंद तर यांच्या मोटारी बंद करा” हा खरा समन्यायी होऊ शकतो.
यावेळी भरत मोरे,इरफान शेख, रावसाहेब थोरात, बाळासाहेब साळुंके, गगन हाडा, विकास शर्मा हजर होते.
शेवटी आभार शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी व्यक्त केले.