अशोक रोहमारे यांना जीवन गौरव पुरस्कार
Lifetime Achievement Award to Ashok Rohmare
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon11 Oct 2021,17:20Pm.
कोपरगाव : प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाने कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला , त्यामुळे मी आज पर्यंत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात एका निष्ठेने जे कार्य करीत आलो आहे त्याला बळ व प्रेरणा मिळाली आहे”, असे भावपूर्ण उद्गार अशोक रोहमारे यांनी के . जे सोमैया महाविद्यालयातील सत्कार समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सचिव ॲड. संजीव कुलकर्णी हे होते.
अशोक रोहमारे पुढे म्हणाले की “मला माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या राजकारणाचा वारसा असला तरी नंतर राजकारणामध्ये शिरलेल्या अर्थकारणाचा मनापासून तिरस्कार वाटू लागला. राजकारणातील लबाडी मला सहन होणार नाही. शैक्षणिक क्षेत्र हेच माझे खरे क्षेत्र आहे.त्यामुळे त्यापासून मी दूर रहाणेच पसंत केले व शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रस घेतला. 1985 ला मूक बधिर व अपंग विद्यालय सुरू केले. आज हे विद्यालय जिल्ह्यातील आदर्श विद्यालय मानले जाते. त्याचे श्रेय परिसरातील व्यापारी, शेतकरी यांनी जे सहकार्य केले त्यांचा मी मनापासून ऋणी आहे.” पोहेगाव येथे पहिले मध्य महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन घेऊन पहिला भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण केले. अड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, “आण्णांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य बघुन मला क्षणभर का होईना सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची आठवण झाली. अण्णांनी घरी कधीही कोणतेही काम केले नसेल परंतु कोपरगावातील मूक-बधिर विद्यालयासाठी घरोघर फिरून धान्य व भाजीपाला जमा करतांना मी त्यांना पाहिले आहे. कॉलेजच्या वतीने स्पुकटो (प्राध्यापक संघटना) च्या स्थानिक शाखा व संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने आण्णा व सौ शोभाताई रोहमारे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करताना आण्णांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. सुनील शिंदे , रावसाहेब रोहमारे, सौ. मंदाताई रोहमारे, अड. राहुल रोहमारे संदीप रोहमारे तसेच कोपरगाव, चासनळी व जवळके येथील तीनही कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जिभाऊ मोरे यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. संजय अरगडे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. बी.एस. गायकवाड, डॉ. एन. जी. शिंदे, आदी प्राध्याक व कार्यालयीन कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.