मोकाट व भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन करू – इशारा ॲड. रश्मी कडू
Take care of stray animals, otherwise we will agitate – Ishara Adv. Rashmi Kadu
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed13 Oct 2021,19:00Pm.

कोपरगाव : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा मुक्त संचार पाहण्यास मिळत आहे. त्यांचा बंदोबस्त करा, तातडीने बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यांनी प्रेरणा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा ॲड. रश्मी मनोज कडू यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन बुधवारी नगरपालिका अधिकारी श्वेता शिंदे यांना दिले आहे .
कोंडवाडा नसल्याने शहरात मोकाट जनावरांनी रस्त्यांचा ताबा घेतला आहे. त्यात आता मोकाट कुत्र्यांची देखील भर पडली आहे. कुठल्याही क्षणी मोकाट कुत्रे हल्लाबोल करतात. त्यामुळे रस्त्यावरून फिरणारी लहान मुलेच नव्हे तर वयस्करदेखील धास्तावली आहेत. महापालिकेने मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांना निर्भयपणे रस्त्यावर फिरता यावे अशी अपेक्षा ॲड. रश्मी कडू व्यक्त करीत आहेत.
ॲड. रश्मी कडू यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई व्हावी म्हणून बाजारतळात कोंडवाडा होता, परंतु पालिकेने कोंडवाडा हटविल्यामुळे जनावरांचे पालन-पोषण करणाऱयांना चांगलेच फावले. दुभत्या गाईंसह गुरेदेखील मोकाट सोडली जातात. विशेषतः कळपाकळपाने फिरणारी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. कधी कधी ही मोकाट जनावरे उधळतात आणि सैरभैर धावतात. त्यात अनेक जण जखमी होतात. कोंडवाडा नाही आणि दंडात्मक कारवाई नाही त्यामुळे जनावर मालकांवर कुठलाही धाक राहिलेला नाही.
सदर मोकाट व भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास नगरपालिका कार्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, इशारा याचा पुनरुच्चार ॲड. रश्मी कडू यांनी शेवटी केला आहे.





