राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निधन 

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निधन

President of Rashtrasant Janardan Swami Ashram Trust Mohanrao Chavan passed away

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 31 Oct 2021,18:30Pm.

कोपरगांव:  कोपरगांव बेट भागातील श्री राष्ट्रसंत जर्नादन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिराचे तसेच नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथील आश्रमाचे अध्यक्ष, शिवभक्त व जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य ह.भ.प. मोहनराव पिराजी चव्हाण उर्फ अण्णा वय (८४) यांचे नाशिक येथे खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे सुनिल, अनिल, संदिप ही तीन मुले, सुना, नातू पणतू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर सोमवार  (१ नोव्हेंबर) आज सकाळी १०.३० वाजता जेऊरकुंभारी येथे अंत्यसंस्कार करण्यांत येणार आहेत.

           स्व. मोहनराव चव्हाण यांनी कोपरगांव बेट भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) ट्रस्टची १९८४ मध्ये स्थापना केली होती. ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत कार्यालयीन अधीक्षक,  अकाउंटंट, साखर सर व्यवस्थापक पदावर स्थापनेपासून कार्यरत होते. त्यांनी ३८ वर्ष सेवा केली. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या राजकीय जडणघडनीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.  कोपरगाव विधानसभा १९७२ च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांना त्यांनी मोठी साथ दिली.  राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हयातीत त्यांनी औरंगाबाद, नाशिक, त्र्यंबकेश्वर, , कोपरगांव आदी परिसरात शिव मंदिरे, शिवभक्ती, श्रमदानातून जनार्दन स्वामीच्या अध्यात्मीक विचारांचा पाया घालत त्यास मोलाची साथ दिली. कोपरगांवच्या ट्रस्ट बरोबरच ते नाशिक व त्र्यंबकेश्वर जनार्दन स्वामी (मौनगिरी) ट्रस्टचे आजपर्यत अध्यक्ष होते. जनार्दन स्वामीचे १०/१२/१९८९ मध्ये महानिर्वाण झाल्यानंतर बेट भागात त्यांचे भव्यदिव्य समाधी मंदिर उभारून पंचधातूची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तत्कालीन राष्ट्रपती भैरवसिंग शेखावत यांना कोपरगांव येथे पाचारण करून राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे टपाल तिकीट काढण्यांतही त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. लहान मुलांना अध्यात्मीक शिक्षणाबरोबरच सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी कोपरगांव बेट भागात संत जनार्दन स्वामी महाराज महर्षि स्कुलची सर्वप्रथम स्थापना करून शैक्षणिक प्रगतीत नावलौकिक मिळवला. जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणानंतर अध्यात्मिक कार्यात स्व. मोहनराव चव्हाण यांनी मोठा हातभार लावला, प्रदोष त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींची पुण्यतिथी, ललिता पंचमी,  जपानुष्ठान सोहळा याची ख्याती महाराष्ट्र राज्यभर पसरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाबद्दल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे माजीमंत्री शंकरराव कोल्हे, आमदार राधाकृष्ण विखे, आशुतोष काळे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोसाका उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष विजय वहाडने, माजी स्थापत्य अभियंता माधवराव पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्ट चे सर्व विश्वस्त आदिंनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page