कोरोनात विधवा झालेल्या महिलांना आ. काळेकडून स्वतःहाचे तीन महिन्याचे वेतन दिवाळी भेट
To widows in Corona. Kale’s own three-month salary Diwali gift
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon1 Nov.2021,19.00Pm.
कोपरगाव: कोरोना संकटामध्ये पती गमवलेल्या मतदार संघातील साडेतीनशे महिलांना दुःख विसरा आणि आता लढायला शिका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. असे सांत्वन करून आमदार आशुतोष काळे यांनी आपले तीन महिन्याची वेतन कर्तव्य निधी म्हणून दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली त्यांच्या या आदर्शवत उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
यावेळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुनराव काळे, सुधाकर रोहोम, अनिल कदम, मधुकर टेके, रोहिदास होन, धरमचंद बागरेचा, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ. सपना मोरे, सौ. वर्षा शिंगाडे, सौ. उमा वहाडणे, सौ. सुहासिनी कोयटे,सौ. संगिता मालकर, सौ. सुधा ठोळे, सौ. स्वप्नजा वाबळे, सौ. वैशाली आभाळे, डॉ. सौ.वैशाली आव्हाड, मीना गुरले, रुपाली गुजराथी, गायत्री हलवाई उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले की, कोरोनात जिवाभावाची माणसं सोडून गेली आहेत. ते दु:ख मी देखील सोसले आहे. कुटुंबातील एकमेव कमावता गेल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा, उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हे प्रश्न या महिलांपुढे आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या उद्देशातून छोटीशी कर्तव्यभेट म्हणून मी माझे तीन महिन्याचे वेतन मी दिले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळवून देण्यास प्राधान्य देईल हक्काचा भाऊ समजून माझ्याशी किंवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करा तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी महिला भगिनींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- रक्षाबंधनाच्या वेळी कोरोनाने पती गमाविलेल्या महिलांना तीन महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. दुर्दैवाने काही दिवसानंतर मला देखील कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांचे दुःख पाहिले आहे ते दुःख मी सोसले आहे. सर्वच प्रश्न भावना व्यक्त करून सुटत नसतात त्यासाठी मदत देखील महत्वाची असते. त्यामुळे मी आपल्याला आर्थिक मदत म्हणून कर्तव्य भेट देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आशीर्वादानेच मी या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलो. -आ.आशुतोष काळे.