निळवंडे पाणी योजनेसह साठवण तलावातील तांत्रिक मंजुरीच्या जाचक अटी रद्द करून दोन्ही योजना मार्गी लावा- विवेक कोल्हे

निळवंडे पाणी योजनेसह साठवण तलावातील तांत्रिक मंजुरीच्या जाचक अटी रद्द करून दोन्ही योजना मार्गी लावा- विवेक कोल्हे

With the Nilwande Water Scheme, both the schemes should be sorted out by canceling the onerous conditions of technical approval in the storage pond – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue16 Nov.2021,20.30Pm.

कोपरगाव : आमदारांना सुदैवाने शिर्डी संस्थानचे अध्यक्ष पद मिळालेले आहे. निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईप योजना मार्गी लावून पाच नंबर साठवण तलावातील जाचक अट ४,५ व २६ रद्द कराव्यात, व दोन्ही योजना मार्गी लावाव्यात अशी मागणी कोपरगावकरांच्या वतीने औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मंगळवारी (१६) रोजी भाजप संपर्क कार्यालय येथे दुपारी झालेल्या पत्रकार परिषदे मधून केली. त्यामुळे त्यांना निळवंडे पाईपलाईन योजनेसंदर्भात केलेले पाप धुवून काढण्याची संधी मिळालेली आहे असेही कोल्हे यावेळी म्हणाले,

विवेक कोल्हे म्हणाले, साठवण तलाव पाच नंबरसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी देताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी अट क्रमांक ४ व ५ मध्ये स्पष्टपणे मंजूर झालेल्या निळवंडे धरणातील पाण्यावरील हक्क सोडून द्यावा, अट क्रमांक २६ प्रमाणे साठवण तलावाची योजना ही वाढीव आरक्षणाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे निवेदने पूर्वी प्रस्तावित योजनेसाठी लागणारे वाढीव पाणी आरक्षण प्राप्त करून घेण्याची जबाबदारी मुख्याधिकारी कोपरगाव यांची राहील असे स्पष्ट नमूद केले आहे. अट क्रमांक २६ चा विचार विचार करता दारणा धरणावर पिण्यासाठी ४५ टक्के औद्योगिक साठी ३६% असे बिगर  सिंचन पाण्याचे आरक्षण ८१ टक्क्यावर गेल्यामुळे सिंचनासाठी वाढीव पाणी राहिलेले नाही, परिणामी २५ हजार हेक्‍टर शेती पाण्यावाचून उद्ध्वस्त होणार आहे. तेव्हा इथून पुढे दारणा धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनेस वाढीव आरक्षण मंजूर होईल की, नाही याबाबत शंका निर्माण होते. मग १२० कोटीची पाणी योजना पुढील पंचवीस वर्षाची कोपरगाव ची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आली आहे, असे कसे म्हणता येईल ? आराखडा कोणत्या भरवंश्यावर करण्यात आला आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावासाठी १२० कोटींचे अंदाजपत्रक आहे. यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी पालिकेला एक कोटी वीस लाख रुपये भरावयाचे आहेत. ते भरण्यासाठी पालिकेने वीस लाख याप्रमाणे सहा हप्ते करून द्यावे, म्हणून विनंती केलेली आहे. या १२० कोटी  योजनेसाठी पालिकेला बारा कोटी लोक वर्गणी भरावी लागणार आहे. ते बारा कोटी आणणार कुठून ? आणि ते भरण्यासाठी नगरपालिकेला किती हप्ते करून द्यावे लागतील.? आधीच पाटबंधारे विभागाचे आठ ते नऊ कोटी कर्ज वीज मंडळाची काही कोटी थकबाकी अशी कोट्यावधीची कर्ज असलेल्या नगरपालिकेवर हा कोट्यावधीचा आर्थिक बोजा अर्थात कोपरगावकरांवर हा बोजा पडणार आहे. उलट निळवंडे शिर्डी कोपरगाव या २६० कोटीच्या मंजूर झालेल्या योजनेत एक रुपयाही कोपरगाव नगरपालिकेला भरावयाचा नाही. दुसरे असे की, न्यायालयाने दिलेल्या आदेशात निळवंडे लाभ क्षेत्रात असलेल्या १८२ गावांनी पिण्याचे पाण्याचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. संबंधित १८२ गावांना एम. डब्ल्यू. आर. आर. कडील त्यांचा असलेला हक्क माननीय उच्च न्यायालयाने कायम स्वरूपी खुला ठेवला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की निळवंडे धरणावर संगमनेर, शिर्डी, राहाता, कोपरगाव व हे १८२ गावांना पिण्यासाठी साठी लागणारे पाणी हे फक्त पंधरा टक्के च्या आतच आहे. म्हणजे कोणाचे हक्काचे पाणी पळविण्याचा प्रश्न येथे येत नाही. निळवंडेचे बंद पाइपद्वारे स्वच्छ, ताजे व नियमित पिण्याचे पाणी मिळणार आहे. सर्वच ठिकाणी दोन दोन तीन तीन ठिकाणांहून शहरासाठी पाण्याचे स्त्रोत असताना कोपरगावलाच दुसरे पाणी हवे असेल तर निळवंडे चा हक्क सोडण्याची जाचक अट का ? व कुणी टाकली ? हे सुज्ञ कोपरगावकरांना सांगण्याची गरज नाही. मात्र कोणाच्या दबावाखाली ही अट टाकली याचा जाब आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला  विचारणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले,ज्या ५ नंबर साठवण तलावाचे सूप वाजविले जात आहे मुळात हा साठवण तलाव व्हावा. या प्रस्तावास १३ नोव्हेंबर २०१४ साली तत्कालीन नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई यांनी मंजुरी दिली. होती त्यास नगरसेवक अतूल काले सूचक व अनुमोदक बबलू वाणी होते. साठवण तलावाच्या सर्वेक्षण अंदाजपत्रकासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना ४ नोव्हेंबर २०१५ रोजी पाच लाख रुपये व ८ जानेवारी २०१६ रोजी दोन लाख रुपये धनादेश दिला होता. याचा अर्थ पाच नंबर साठवण  तलावाची सुरुवात आम्ही केली, जमीन मिळवून दिली, त्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी आजपर्यंत लागणारे सर्व ठराव भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केलेले आहेत. तांत्रिक मंजुरीसाठी लागणारे सर्व प्रकारचे ठराव नगराध्यक्षांनी मंजूर केलेले आहेत, त्यासाठी लागणारी तांत्रिक फीची रक्कम नगरपालिका नागरिकांच्या कररुपी रकमेतून भरणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता नगरपरिषद प्रशासन करीत आहे. हे सर्व असताना तुमचा काडीमात्र संबंध नसताना शहरात सर्व ठिकाणी तुम्ही स्वतःच्या अभिनंदनाचे १२० बोर्ड १२० च्या वेगाने लावले, ढोल ताशे वाजवले, पेढे वाटले, अशी जोरदार टीका विवेक कोल्हे यांनी केली .

विवेक कोल्हे म्हणाले,  ही निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईप योजना २०१८ साली मंजूर झाल्यानंतर न्यायालयात गेल्यामुळे रखडली गेली, अन्यथा या डिसेंबर मध्ये कोपरगावकरांना योजना पूर्ण होऊन ते निळवंडे चे पाणी पिण्यास मिळाले असते. २०१९ ला उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आहे. सुदैवाने तुम्ही शिर्डी संस्थानचे अध्यक्ष झाला आहात, तेंव्हा तुम्ही आता श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांना निळवंडे धरणातून पाणी न येऊ देण्याचे पाप करणार का ? असा थेट सवाल करून कोपरगावच्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो, साठवण तलावाच्या तांत्रिक मंजुरीतील अट क्र.४,५ व २६ या जाचक अटी काढून निळवंडे बंदिस्त पाईपलाईन योजना मार्गी लावावी, यासाठी हवे तर कोळपेवाडीला येतो, दोन्ही योजना चालू झाल्या, तर तुमच्या अभिनंदनाचे २४० बोर्ड २४० च्या वेगाने लावतो असे आश्वासन विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेच्या समारोपात दिले .

चौकट

पाच नंबर साठवण तलावाचे गाजर दाखवून विधानसभा पदरात पाडून घेतली आता नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तांत्रिक मंजुरीचे मांत्रिक तयार झाल्याची जोरदार टीका विवेक कोल्हे यांनी विरोधकांवर केली.

पत्रकार परिषदेसाठी अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारूणकर, भाजपा गटनेते रवींद्र पाठक, सेना गटनेते योगेश बागुल, विजय आढाव उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक विजय वाजे, स्वप्नील निखाडे,शिवाजी खांडेकर, नारायण शेठ अग्रवाल, बबलू वाणी, वैभव गिरमे, बाळासाहेब नरोडे, रवींद्र कथले, बापू पवार,दादा नाईकवाडे, सोमनाथ म्हस्के, प्रशांत कडू, संदीप देवकर, महेंद्र नाईकवाडे. विजय चव्हाणके, रवींद्र रोहमारे, पिंकी चोप्रा, दीपक जपे, अल्ताफ कुरेशी, अशोक लकारे, किरण सुपेकर, निलेश बोराडे. गोपी गायकवाड, खलिक कुरेशी., रामचंद्र साळुंके, आसिफ शेख, आधी शिवसेना भाजपा पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page