सोनेवाडीची प्रियंका जावळे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी
Priyanka Jawale of Sonewadi is an official in the Union Ministry of External
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat20 Nov.2021 17.40Pm.
कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथील निवृत्त शेतकी अधिकारी मनोज किसन जावळे यांच्या कन्येची केंद्र सरकारच्या समस्तर प्रवेश पद्धती अंतर्गत परराष्ट्र मंत्रालयात डॉ. प्रियंका मनोज जावळे यांची निवड करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयातील विधी आणि करार विभागात विधी अधिकारी या पदावर काम करण्याची प्रियंका जावळे यांना संधी मिळाली आहे. त्या पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या कार्यरत आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील विधी आणि करार विभागात विधी अधिकारी म्हणून सहा जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत समस्तर प्रवेश पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात आली.त्यात देशभरातून आलेल्या अर्जाची छाननी करून १८८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीतून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली त्यात सोनेवाडीच्या प्रियांका जावळे यांचा समावेश आहे.
प्रियंका जावळे यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर आयएलएस विधी महाविद्यालयातून पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी संपादन केली. वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दुर्गाबिनी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका जावळे यांनी पोस्ट-डॉक फेलो म्हणून संशोधन करत आहे. अनुउर्जा कायदा अवकाश कायदा आणि धोरण हे प्रियांका यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
आत्तापर्यंत काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये प्रियांका जावळे यांना सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. गेली अकरा वर्षे अनुऊर्जा आणि अवकाश कायदा धोरण या विषयात त्या काम करत आहे. माझ्या अभ्यासाचा देशाला उपयोग व्हावा हा विचार होता त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाची जाहिरात पाहिल्यावर मी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आता प्रत्यक्ष निवड झाल्याचा आनंद आहे देशासाठी काहीतरी करता येईल अशी भावना प्रियंका जावळे यांनी व्यक्त केली. प्रियंका जावळे यांच्या निवडीचे कोपरगाव तालुक्यात विविध स्तरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.





