गोधेगावच्या तन्मय रांधवणेला नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची पीएच.डी.

गोधेगावच्या तन्मय रांधवणेला
नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची पीएच.डी.पदवी

२६ व्या वर्षी पीएच.डी.चा मानकरी

वृत्तवेध ऑनलाईन 13 जुलै 2020

कोपरगाव : तालुक्यातील गोधेगाव च्या तन्मय विठ्ठल रांधवणे याने अवघ्या २६ व्या वर्षी अमेरिकेच्या मानांकित नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.मुलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्याचा आपला मानस असल्याचे तन्मय यांने सांगितले.

तन्मय हा रयत शिक्षण संस्थेतील प्रा. विठ्ठल रांधवणे आणि प्रा.डॉ. प्रतिभा रांधवणे यांचा मुलगा आहे.

अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर तालुक्यातील गोधेगाव येथील तरुण वयाच्या २६ व्या वर्षी पीएच.डी.चा मानकरी ठरला आहे. ग्रामीण भागातील तरुणाने बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तन्मय सध्या अमेरिका स्थित मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांचे विविध संशोधन नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच स्पेन, चीन येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात संशोधन कार्याचा सन्मान करण्यात आला. “पादचाऱ्यांची सामाजिक धारणा आणि व्हर्च्युअल साधनांच्या उपयोजनातून मानव-रोबोट संवादाचा अभ्यास” हा त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय होता. यासाठी प्रोफेसर डॉ. दिनेश मनोचा यांचे मार्गदर्शन लाभले.

तन्मय यांनी हुपरी येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा जेईई देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मुलभूत संशोधनाची आवड असलेला तन्मय यांनी देशातील प्रतिष्ठित आयआयटी मुंबई येथून संगणकशास्त्रात बी. टेक पदवी पूर्ण केली. अमेरिकेतील सर्वोत्तम संगणक ग्राफिक्स विभाग असलेल्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला, आणि तेथून पीएच.डी.चा अभ्यासक्रम वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण केला.

अभ्यास आणि सातत्याच्या जोरावर गोधेगाव ते अमेरिका हा तन्मय यांचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना गोधेगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपल्या कर्तृत्वान सुपुत्राच्या यशाचा गोधेगाव ग्रामस्थ व आप्तेष्टांनी आनंद साजरा केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page