क्रिकेट खेळताना घशात जळजळीचा त्रास होऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ;
The unfortunate death of a young man with a sore throat while playing cricket;
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 11 Dec.2021 17.30Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील तरुणाचा क्रिकेट खेळून झाल्यानंतर घशात जळजळीचा त्रास जाणवू लागल्याने त्यास उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविले असता त्यास तपासून दुसऱ्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यास सांगितले त्यानंतर एक नाही, दोन नाही तब्बल सहा रुग्णालयात या पेशंटला हलवण्याची दुर्देवी वेळ या तरुणाच्या नातेवाईक व मित्रपरिवारावर येऊन ठेपली होती. मात्र या दरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लोकेश अर्जुन ढोबळे (२७) असे या मयत तरुणाचे नाव आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील रहिवासी असलेला लोकेश अर्जुन ढोबळे हा तरुण नेहमीप्रमाणे कोपरगाव शहरातील साई सिटी येथील क्रिकेट ग्राउंडवर सिझन बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी आज गुरुवार दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी गेला होता. त्या ठिकाणी प्रॅक्टिस झाल्यावर त्याला घशात जळजळ होत असल्याचे त्याने त्याच्या क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना सांगितले असता त्यांनी लोकेश यास प्राथमिक उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात हलविले त्या नंतर त्यास दुसऱ्या खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी हलविण्यास सांगितले त्यानंतर असे करत करत काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नव्हते तर ज्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होते त्यांनी त्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.या तरुणास शेवट कोपरगाव शहरातील मानवता हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता लोकेश यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.
सदर घटनेने मयत लोकेश याच्या कुटुंबिय, नातेवाईकांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला असून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. लोकेश याचा हृदयविकाराने मृत्यू झाला का आणखी कशाने हे मात्र शवविच्छेदनानंतर निष्पन्न होणार आहे. सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे. मयत लोकेश ढोबळे याचा मनमिळाऊ स्वभाव असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा असून दवाखाना परिसरात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.मयत लोकेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे.