राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज वंदनीय महापुरुष-महंत स्वामी हरीगिरीजी.
Rashtrasant Sadguru Janardan Swami Maungiriji Maharaj Venerable Mahapurush-Mahant Swami Harigiriji.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 18.50Pm.
कोपरगाव: संपूर्ण भारत विश्वात महादेवाचे स्थान अढळ आहे, ते देवांचे देव आहेत, त्यांचा सर्वत्र संचार असतो, भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे ही वंदनीय महापुरुष होते ,असे प्रतिपादन वाराणसी येथील पंचदशनाम जुना आखाडाचे व अखिल भारतीय आखाडा परिषद आंतरराष्ट्रीय संरक्षक महामंत्री श्री महंत स्वामी हरीगिरीजी महाराज यांनी केले.
सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी महाराजांच्या३२ व्या पुण्यतिथीनिमित्त जपानुष्ठान सोहळा समाप्ती प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, सर्वसामान्यजनांना सुसंस्कारित आणि परमार्थ प्रवण करण्याचे मोठे कार्य त्यांनी अल्पावधीत उभे केले. श्रमदानातून सत्कार्य करताना समाजाला श्रमाचे महत्त्व पटवून दिले व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आदी महत्त्वपूर्ण राष्ट्र कार्य करून स्वामीं दैवी मूल्याचे निष्काम कर्मयोगी असल्याचे आपण अनुभवले, संतांचे स्मरण व सेवा सतत करणे हे भाग्योदयाचे लक्षण असते असेही स्वामी हरीगिरीजी महाराज म्हणाले. याप्रसंगी त्यांनी अध्यक्ष व सर्व विश्वस्त यांचा चंदन तिलक लावून पुष्पहार देऊन सत्कार केला.
प्रारंभी नवनिर्वाचीत अध्यक्ष दत्तात्रय होळकर प्रास्तविक करतांना म्हणाले की, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हे सत्पुरुष होते त्यांनी अनेकांना गुरुपरंपरेत मंत्र अनुग्रह देऊन जपानुष्ठान करून घेतल्याने परिवाराचे समाजाचे व राष्ट्राचे धर्माच्या दृष्टीने मोठे पुण्यशील काम केले त्यामुळे त्यांच्यासह सर्व विश्वाचा उद्धार झाला. विविध शाळांची स्थापना करून अनेक गोरगरिबांना शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केली. त्यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळ सतत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मठाधिपती व प्रमुख विश्वस्त संत रमेशगिरी महाराज यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या कार्याचा गौरव करून स्वामींचे प्रतिष्ठान अधिष्ठान व प्रेरणा मोठी होती त्यांचे कार्य अखंडपणे सतत सुरू ठेवू. त्यांची प्रेरणा आम्हाला व त्यांच्या अनुयायांना सतत मार्गदायी ठरो असे आशीर्वचन केले.
सात दिवस चाललेल्या जपानुष्ठान कार्यक्रमास राज्यभरातून ३०० च्या वर भाविक बसले होते. जनार्दन स्वामी समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. समाधी स्थान आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रदोष गुरुवारी पहाटे स्वामींच्या समाधीची महापूजा, नित्य नियम विधी पठण, काकड आरती स्वामींच्या पादुकांचे पूजन व सत्संग सोहळा संपन्न झाला.
राज्यभरातून जनार्दन स्वामींच्या दिंड्या येथे आल्या होत्या. सांगता सोहळ्यानंतर हजारो भाविकाना आमटी, भाकरी, बुंदी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी तसेच जनार्दन स्वामी भक्त मंडळ कार्यकर्त्यांनी त्याचे नियोजनबद्ध वाटप केले. सूत्रसंचालन विश्वस्त भाऊ पाटील यांनी केले तर स्वामी रमेशगिरी महाराजांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, सुभाष शिंदे, संदीप चव्हाण, विलास होते, अतुल शिंदे यांच्यासह हजारो भाविक भक्तगण उपस्थित होते.
चौकट .
आश्रमास सव्वा अकरा एकर जमीन दान…..
स्वर्गीय दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ मिलन दौलतराव चव्हाण, मंगल चव्हाण व सतीश चव्हाण यांनी समाधी मंदिरालगत असलेली सव्वा अकरा एकर जमीन जनार्दन स्वामी आश्रमला दान दिली अशी माहिती अध्यक्ष दत्तात्रय होळकर व मठाधिपती संत रमेश गिरी महाराज यांनी दिली.
चौकट
महाप्रसाद म्हणून एकतीस क्विंटल बुंदी, तीस हजार लिटर आमटी, व पंचक्रोशीतील विविध गावातून ११ ट्रॅक्टर भाकरी व चपात्यांचे वाटप करण्यात आले.






