कोपरगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलजीवन मिशन योजनेंतर्गत कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनांना ४३.३९ कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांशी गावे हि मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिणींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांचा कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळविण्यात यश आले आहे. परंतु कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालूक्यातील कोळपेवाडी गावच्या पाणीपुरवठा योजनेला १८ कोटी ४६ लाख ८२ हजार ४६४, सुरेगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी ६९ लाख २६ हजार ७८१ व कुंभारी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ०९ कोटी २३ लाख १४ हजार ८२८ अशी एकूण या तीनही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४३ कोटी ३९ लाख २४ हजार रुपयांची तांत्रिक मंजुरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासुनचा या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आ.आशुतोष काळे यांना मोठे यश मिळाले आहे. पाणी पुरवठ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सुरेगाव, कोळपेवाडी, कुंभारी ग्रामस्थांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. उर्वरित मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असून या योजनांना देखील लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनांना ४३.३९ कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.