बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्या, कोपरगाव भाजपाचे निवेदन

 बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्या, कोपरगाव भाजपाचे निवेदन

Resign Minister Jitendra Awhad who made absurd statements, Kopargaon BJP statement

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 6 Jan.2022 17.60Pm.

 कोपरगाव :  राज्यातील इतर मागास वर्ग समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या समाजाचा अपमान केला आहे, तेव्हा महाविकास आघाडी शासनाने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशा आशयाचे निवेदन कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोपरगावच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना गुरुवारी देण्यात आले.

  या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महा विकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे व उदासीन भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णत: स्थगित झालेले आहे. राज्यातील गेल्या सहा महिन्यात सात जिल्हा परिषद व १०६ नगरपंचायतीच्या निवडणुका या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवायच घेण्यात आल्या. एकीकडे ५२% च्या वर असणाऱ्या ओबीसी समाजावर असा अन्याय महाविकास आघाडी सरकार करीत आहे व दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्राह्मणवाद्यांचा पगडा असलेला समाज आहे, ओबीसी समाजाचा संघर्षाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे.

एकीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे दुष्ट काम करायचे व दुसरीकडे वरील प्रमाणे वक्तव्य करून समस्त ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम करायचे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दिसून येते. मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी व महाविकास आघाडी शासनाने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागून घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी.आर.काले, ओबीसी शहराध्यक्ष जगदिशजी मोरे, उत्तरनगर जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, उत्तरनगर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिपक तु. राउत, राहुल सुर्यवंशी, उत्तरनगर जिल्हा ओबीसी चिटणीस अंकुश कुऱ्हे, उत्तरनगर जिल्हा ओबीसी कार्यकारीणी सदस्य दिनकर बोंडखळ, रवि पाठक, प्रदिप नवले, भायुमोरचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, सरचिटणीस दिपक चौधरी, सुशांत खैरे, राजेंद्र सोनवणे, बापु पवार, शेतकरी आघाडीचे सतिष रानोडे, गोपीनाथ गायकवाड, अशोक लकारे, अनु.जाती सेलचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, भाजप अल्प संख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीकभाई कुरेशी, सागर राउत आदी उपस्थितीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page