गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; पोनि. माणगावकर यांची सूचना
गणेश मंडळांना मान्य
कोपरगाव पालिकेत गणेश मंडळ बैठक
वृत्तवेध ऑनलाईन 14 July 2020
By : राजेंद्र सालकर
कोपरगाव : देशासह जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव म्हणून ओळख असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात (१३ जुलै) रोजी सायंकाळी सहा वाजता नगरपालिका प्रांगणात एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचना आणि निर्णय मान्य असल्याचे मंडळांनी या वेळी सांगितले. कोरोना व्हायरस संकट अधिक गडद होत असताना राज्यातील सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोस्तव अवघा ४१ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) आणि पाळले जाणारे सोशल डिस्टन्सिंग यांमुळे यंदा गणेशोत्सवाचे काय होणार? याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. हा प्रश्न गणेश भक्तांसह सर्वांनाच सतावत होता. दरम्यान, या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांमुळे आता तोडगा निघाला आहे. गणेश उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदा राज्यासमोर असलेले कोरोना व्हायरस संकटाचे आव्हान पाहता सर्वच गणेश मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशा सूचना पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केल्या. त्याला सर्वच गणेश मंडळांनी एकमुखी सहमती दर्शवली. तसेच, राज्य सरकारचे निर्णय आणि सूचना आपल्याला मान्य आहेत. सरकारच्या परीपत्रकाप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सरकारला अवश्य ते सर्व सहकार्य करण्याची गणेश मंडळांची तयारी दाखविली आहे. कोणताही अडथळा आणला जाणार नाही, असे आश्वासन मंडळांनी या वेळी दिले.
दरम्यान, राज्य सरकारच्या सूचनेनंतर केवळ गणेशोत्सव साधेपणाने नव्हे तर आगमन सोहळेही रद्द करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. दरम्यान, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करत असताना आगमन सोहळे रद्द झाले आहेत. त्यासोबतच गणेशविसर्जन मिरवणूक काढण्यासही परवानगी नाही. त्यामुळे गणेश मंडळांना मिरवणुकाही अत्यंत साधेपणाने काढाव्या लागणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही. याची सर्व मंडळांनी नोंद घ्यावी असेही पोनि. माणगावकर यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती चार फूट तर घरातील मूर्ती दोन फूट असावी, विसर्जन करताना घरीच विसर्जन करावे, गणेशोत्सवासाठी शक्यतो घरातील धातूची गणेश मुर्ती वापरावी, सार्वजनिक ठिकाणी सजावट देखावे न करता कोरोना व साथीचे रोग याबाबत प्रबोधनात्मक व जनजागृती करणारे फलक लावावे, जेणेकरून गर्दी होणार नाही असे कुठलेही कृत्य करू नये, पालिका प्रशासन व स्थानिक प्रशासांची परवानगी घेणे हे बंधन कारक असेल, मा.न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे, देखावे व घरगुती गणपती व मंडळ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम,स्टेज डेकोरेशन,व सामुहिक आरती घेऊ नये, मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांकडे आग्रह धरू नये, विसर्जन करताना घरगुती/चाळीचे/इमारतीचे विसर्जन हे एकत्रितरीत्या करू नये व लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी घरीच थाबावे. अशा अनेक सूचना केल्या, व शासनाचे पुढील नियमावली आल्यानंतर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी गणेश मंडळ पदाधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्यातील नगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिली आहे.