कोपरगावात दोन बसेसवर दगडफेक; चालक जखमी, शहर पोलिसात गुन्हे दाखल
Stone pelting on two buses in Kopargaon; Driver injured, city police file charges
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.00Pm.
कोपरगाव : हळूहळू आगारातून बससेवा सुरू झाली असताना काल कोपरगावात एसटी बसवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत एका घटनेत चालक जखमी झाला असून दोन्ही घटनेबाबत कोपरगाव शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एम. एच. १४ बिटी २४६० ही मंगळवारी वैजापूर- कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी निघाली होती . मात्र एक किलोमीटर अंतरावर बिरोबा चौक वडांगळे वस्ती समोर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांपैकी मागे बसलेल्या एका इसमाने बसवर दगडफेक केली. यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते. दगडफेकीमुळे काचा बसच्या आत पडल्याने प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात प्रवासी सुखरूप असून चालकाच्या डोळ्यात काचेचे बारीक तुकडे गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.याप्रकरणी चालक सोमनाथ कचरू भागवत (३०) वैजापूर डेपो, राह. गवंडगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी कोपरगाव शहर पोलिसांमध्ये सायंकाळी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम. एच. १३ सीयू ८४८९ ही बस मंगळवारी आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी दुपारी साडेचार वाजता निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.याप्रकरणी चालक सानप कोपरगाव डेपो रा.बोल्हेगाव, तालुका जिल्हा अहमदनगर यांनी कोपरगाव शहर पोलिसांमध्ये सायंकाळी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पो. हे. कॉ. पुंड हे करीत आहे. मात्र या घटनेने कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकार वारंवार संप मागे घेण्याचं आवाहन करत असताना कामगार मात्र मागण्यांवर ठाम आहेत. काही कामगारांचं निलंबन तर काहींना बडतर्फ करण्यात आलं असून काही आगारांमधील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, तर काही संघटना अद्यापही संपावर ठाम आहेत. अनेक आगारातून कमी अधिक प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी एसटी बसवर हल्ले होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत.





