भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान दुग्ध व्यवसायातले ऐतिहासिक आणि क्रांतीकारी पाऊल – डॉ. नरवाडे

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान दुग्ध व्यवसायातले ऐतिहासिक आणि क्रांतीकारी पाऊल – डॉ. नरवाडे

Embryo transplantation technology is a historic and revolutionary step in the dairy business – Dr. Narwade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 17.00Pm.

कोपरगांव :भ्रूण प्रत्यारोपणाच्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जातिवंत देशी गाईंचे संवर्धन होणार तर आहेच शिवाय या तंत्रज्ञानाच्या वापराने दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हे तंत्रज्ञान दुग्ध व्यवसायातले ऐतिहासिक आणि क्रांतीकारी पाऊल असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन नाशिक विभागाचे प्रादेशिक सह. आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी केले.

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन प्रकल्पांतर्गत बायफ संस्था, उरळीकांचन व संघाच्या संयुक्त सहकार्याने उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ नाशिक पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह. आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांच्या हस्ते व अहमदनगर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सुनील तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन प्रकल्पांतर्गत बायफ संस्था, उरळीकांचन व संघाच्या संयुक्त सहकार्याने उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या भ्रूण प्रत्यारोपण शुभारंभ करताना

या कार्यक्रमासाठी पुणे बायफ संस्थेचे अध्यक्ष बी. के. काकडे, उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पांडे, राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव, बायफ संस्थेचे राज्याचे मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे, प्रमुख कार्यक्रम अधिकारी श्रीमती निधी परमार, कोपरगांव कार्यालयाचे अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, कोपरगांव तालुका लघू पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजय थोरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रध्दा काटे, मुकुंद रानडे, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संघाचे संस्थापक स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पाहुण्यांनी आदरांजली वाहिली. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेतीला पूरक म्हणून सुरु झालेल्या दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चांगला हातभार लावला आहे. पर्जन्यमानाच्या असंतुलीत परिस्थितीमुळे शेती उत्पादन संकटात आल्याने दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला असल्याचे सांगून डॉ. नरवाडे पुढे म्हणाले, संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे आण्णा आणि बायफचे संस्थापक स्व. मणिभाई देसाई यांनी सर्वप्रथम गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात संकरीत गो – पैदास कार्यक्रम राबवून दूध उत्पादन वाढीसाठी मोठी चळवळ उभारली. संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून दिला. या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. बायफ संस्थेने गोदावरी दूध संघाबरोबर करार करुन ज्या ज्या योजना संघाच्या कार्यक्षेत्रात राबविल्या त्या सर्व यशस्वी झालेल्या आहेत. भविष्यात पशुसंवर्धन विभागामार्फत गोदावरी दूध संघाला सहकार्य करु असे आश्वासनही डॉ. नरवाडे यांनी दिले.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबरे यांनी भ्रूण  प्रत्यारोपणविषयी माहिती देताना सांगितले की, हे तंत्रज्ञान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे तंत्रज्ञान आहे. सन १९४९ मध्ये भ्रूण प्रत्यारोपनाची सुरुवात विदेशातून झाली. भारतात हे तंत्रज्ञान १९९० मध्ये आले. मात्र भारतामध्ये या तंत्रज्ञानाचा म्हणावा तितका प्रसार व वापर झाला नाही, त्यामानाने अमेरिका, ब्राझील, डेन्मार्क, इंग्लंड अशा युरोपीयन देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. तेथील दुग्धोत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत काही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आलेले असल्याचेही ते म्हणाले.

संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सांगितले की, गोदावरी दूध संघ आणि बायफ संस्थेने गोदावरीच्या कार्यक्षेत्रामध्ये भ्रूण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम राबविण्यास प्रारंभ केला असून त्यामाध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गाई वाढीसाठी गीर, साहिवाल, देवणी, डांगी, लालकंधारी व गौळाऊ या गाईंच्या जातींचे भ्रूण प्रत्यारोपन कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दशकामध्ये भ्रूण प्रत्यारोपण प्रक्रियेच्या अत्याधुनिकतेचा दर्जा विकसित झालेला आहे. ज्यामुळे गाईमध्ये गैरशस्त्रक्रिया प्रक्रियांचा संपूर्ण वापर, दीर्घकालीन भ्रूण संवर्धन आणि क्रायोप्रिझर्वेशनसह स्टोरेज आणि अगदी अलीकडे मायक्रोमॅनिप्युलेशन तसेच अनुशंवशीक तंत्राज्ञानाशी संबंधित अनेक तंत्रे विकसित झालेली आहे. हे एक वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्याकडील शेतकरी बांधवांनी उपयोग करुन घेणे आता गरजेचे झालेले आहे. यापूर्वी सन २०१६ पासून संघाने बायफ संस्थेच्या सहकार्याने सॉर्टेडसिमेनचा कार्यक्रम हाती घेतला.

आतापर्यंत सॉर्टेडसिमेनचे ७,८३६ रेतन झाले असून पैकी ३,५०६ व्यायल्या आहेत. त्यातून २३५३ कालवडी तर २६४ गोहे जन्माला आलेले आहेत,म्हणजे कालवडी जन्माची टक्केवारी सुमारे ९३ टक्क्याहून अधिक आहे. शेतकऱ्यांना अधिकाधीक लाभ देण्याच्यादृष्टीने संघ व बायफ संस्थेने १ जानेवारपासून सॉर्टेडसिमेन केवळ १५० रुपयामध्ये उपलब्ध करुन दिले आहे. केवळ १८ दिवसामध्ये सॉर्टेडसिमेनचे सुमारे ३,६१० रेतन झाले आहे. मार्च अखेरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. संघाने बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी विचारात घेऊन नव्याने मँगो बर्फी, पेरु बर्फी व मिल्क केक ही उत्पादने सुरु केली असल्याचेही श्री परजणे यांनी सांगितले.

याप्रसंगी बायफ संस्थेचे अध्यक्ष बी. के. काकडे, उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पांडे यांचीही भाषणे झालीत. संघाच्या नव्याने उत्पादीत केलेल्या मँगो बर्फी, पेरु बर्फी व मिल्क केकचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याशिवाय बायफ उत्पादीत विविध चारा पिकांचे बायफ किसान मार्ट विक्री केंद्राचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास संघाचे संचालक व दूध उत्पादक उपस्थित होते. बायफचे अधिकारी सुधाकर बाबर यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page