कृत्रिम रेतन : एका वर्षात ५१ हजार प्लस ; गोदावरी दूध संघाचा नवा उच्चांक – राजेश परजणे
९ हजार ८८६ कालवडी जन्मास
वृत्तवेध ऑनलाइन 15 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : संकरीत गोपैदास वाढविण्यासाठी
अमेरिकेच्या सॉर्टेड सीमेनचा ( सुधारित वीर्य ) उपक्रम राबविण्याचा देशात पहिला मान गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघास मिळाल्यानंतर सन २०१९ २० या एका वर्षात बायफ संस्थेच्या सहकार्याने सुमारे ५१ हजार ६५ कृत्रिम रेतनाचा उपक्रम राबवून गोदावरी दूध संघाने अहमदनगर जिल्ह्यात नवा उच्चांक प्रस्तापित केला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष

राजेश परजणे यांनी दिली.
गोदावरी दूध संघ व बायफ विकास संशोधन प्रतिष्ठान, उरळीकांचन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीवंत होस्टीन व जर्सी वळुच्या सिमेन वापरातून दैनंदिन २५ लिटरहून अधिक दूध देणाऱ्या हजारो गाई गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. कार्यक्षेत्रातील कोपरगांव, राहाता, येवला, वैजापूर, सिन्नर आदी तालुक्यांतील एकूण ३४ पशुधन विकास केंद्रांमार्फत २०१९ – २० या एका वर्षामध्ये ५१ हजार ६५ गाईंना कृत्रिम रेतन केले गेले असून या कालावधीमध्ये सुमारे ९ हजार ८८६ कालवडी जन्मास आलेल्या आहेत. या सिमेनचे गर्भधारनेचे प्रमाण सरासरी ५० टक्क्याहून अधिक आलेले आहे. कालवडींपेक्षा गो-यांचा जन्मदर अतिशय कमी आहे.





